मुंबई : राज्यभरातून आठ शहरांतील महाविद्यालयीन नाटय़वेडय़ा तरुणाईचा सळसळता उत्साह, उत्कट रंगमंचीय आविष्कार आणि आजूबाजूच्या वास्तव परिस्थितीवर नाटकाच्या माध्यमातून अभिव्यक्त होण्याची आणि त्यांच्या अफाट ताकदीचा रोमांचक अनुभव देणारी ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. आठ महाविद्यालयांच्या आठ एकांकिकांमध्ये खऱ्या अर्थाने लोकांकिकेचा बहुमान मिळवण्यासाठी कलगीतुरा रंगणार आहे.
‘लोकसत्ता’ आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत, सहप्रायोजक ‘झी युवा’, ‘टुगेदिरग’, पॉवर्ड बाय ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘केसरी टूर्स’ आणि ‘मे. बी. जी. चितळे डेअरी’ आणि ‘अस्तित्व’चे साहाय्य तसेच ‘आयरिस प्रॉडक्शन’ टॅलेंट पार्टनर म्हणून लाभलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा शेवटचा अंक या आठवडय़ाच्या अखेरीस रंगणार आहे.
आठ विविध केंद्रांवरून प्राथमिक आणि विभागीय अंतिम फेरीचे आव्हान पूर्ण करण्यात यशस्वी ठरलेल्या आणि महाअंतिम फेरीत पोहोचलेल्या आठ एकांकिकांचे संघ शनिवारी, १७ डिसेंबरला मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरी सोहळय़ात ‘लोकसत्ता लोकांकिका’चा बहुमान मिळवण्यासाठी सज्ज झाले आहेत. गेले तीन ते चार आठवडे राज्यभरातील महाविद्यालयीन तरुणाई ‘लोकांकिका’मय झाली आहे. महाविद्यालयांच्या सत्रांत परीक्षा, अन्य एकांकिका स्पर्धासाठी झालेली धावपळ अशा कित्येक आव्हानांना हसतखेळत तोंड देत हे तरुण स्पर्धक ‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत दाखल झाले.
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद आणि रत्नागिरी अशा आठ केंद्रांवर ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या प्राथमिक फेऱ्या आणि विभागीय अंतिम फेऱ्या पार पडल्या. करोनामुळे दोन वर्षांच्या खंडांनंतर झालेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेला राज्यातील महाविद्यालयीन तरुणाईने भरभरून प्रतिसाद दिला. अनेकांनी या वर्षी ही स्पर्धा होणार हे लक्षात घेऊन आधीच संहिता लेखनापासून पूर्वतयारीही करून ठेवली होती.
गेल्या दोन वर्षांत जगभरात लोक अनेकविध घटना, अनुभवांना सामोरे गेले आहेत. दोन वर्षांच्या काळात जग अनेक अर्थाने बदलले आहे, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकमेकांशी जोडली गेलेली माणसे काही काळापुरती का होईना आपल्या माणसांच्या अधिक जवळ आली. या काळात झालेल्या कौटुंबिक, सामाजिक, वैश्विक, राजकीय बदलांच्या घुसळणीतून जे जे काही सापडले, नव्याने जाणवले अशा अनेक विषयांचे पडसाद ग्रामीण आणि शहरी भागातील महाविद्यालयांनी साकारलेल्या एकांकिकांमधून उमटलेले पाहायला मिळाले.
मुलांनी ज्या नेटकेपणाने, कुठलीही भीडभाड न बाळगता सादर केलेले वैविध्यपूर्ण विषय पाहून आश्चर्याचा सुखद धक्का बसल्याची नोंदही स्पर्धेच्या मान्यवर परीक्षकांनी केली. अगदी ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मंचावर एकांकिका सादर करणाऱ्या गुणवान लेखक, दिग्दर्शक, कलाकार यांना हेरून दूरचित्रवाहिनी वा चित्रपटाच्या माध्यमातून संधी देणाऱ्या ‘आयरिस प्रॉडक्शन’च्या मान्यवर प्रतिनिधींनीही यंदा तरुण कलाकारांकडून अप्रतिम विषयांचे सादरीकरण आणि अभिनय पाहायला मिळाल्याचे सांगितले.
विषय निवड, संहिता लेखन असा चढत्या भाजणीने सुरू झालेल्या या तरुणाईचा ‘लोकसत्ता लोकांकिका’चा प्रवास उत्तरोत्तर अधिकच रंगत गेला. या प्रवासाचा कळसाध्याय १७ डिसेंबरला रवींद्र नाटय़मंदिरमध्ये होणाऱ्या महाअंतिम फेरी सोहळय़ाच्या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे.
मान्यवर परीक्षकांची उपस्थिती..
‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेने सुरुवातीपासूनच नाटय़वर्तुळातील मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले आहे. नव्या संहितेची निवड, नाटक-चित्रपट-मालिका क्षेत्रातील अनुभवी जाणकारांचे मार्गदर्शन, विजयाबाई मेहता, नसीरुद्दीन शाह, महेश एलकुंचवार, अमोल पालेकर, सतीश आळेकर, मकरंद देशपांडे, मनोज वाजपेयी अशा मान्यवर कलाकारांचे विचार ऐकण्याची विद्यार्थ्यांना लाभणारी संधी अशा वैशिष्टय़ांमुळे ही स्पर्धा इतर एकांकिका स्पर्धाच्या गर्दीतही वेगळी ठरली आहे. यंदाही नाटक, चित्रपट आणि मालिका या तिन्ही आघाडय़ांवर कार्यरत असलेले नवे-जुने कलाकार, लेखक-दिग्दर्शक परीक्षक म्हणून लाभले. शिल्पा नवलकर, संदेश बेंद्रे, विश्वास सोहोनी, हेमंत भालेकर, नीळकंठ कदम, दत्ता पाटील, गणेश पंडित, डॉ. अनिल बांदिवडेकर, अरुण कदम, अद्वैत दादरकर, सुयश टिळक, संपदा जोगळेकर, सचिन गोस्वामी, अजित भुरे, शीतल तळपदे, विजय निकम, अंबर हडप, समीर चौघुले, अरविंद औंधे, अश्विनी गिरी, मकरंद माने, देवेंद्र गायकवाड, प्रदीप वैद्य, विजय पटवर्धन, सुबोध पंडे या मान्यवरांनी ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले.
* या सोहळय़ाच्या विनामूल्य प्रवेशिका १७ डिसेंबरला सकाळी ९ वाजल्यापासून रवींद्र नाटय़मंदिर येथे उपलब्ध होतील. एका व्यक्तीला एक प्रवेशिका दिली जाईल. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव आहेत.
प्रायोजक : लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा सहप्रायोजक ‘झी युवा’ आणि ‘टुगेदिरग’च्या सहकार्याने पार पडणार आहे. ही स्पर्धा पॉवर्ड बाय ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘केसरी टूर्स’ आणि ‘मे. बी. जी. चितळे डेअरी’तर्फे आहे. साहाय्य ‘अस्तित्व’ चे आहे. लोकांकिकेच्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट, मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन‘ टॅलेंट पार्टनर आहेत.
महाअंतिम सोहळा ..
* कधी : १७ डिंसेंबर
* कुठे : रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी * वेळ : सकाळी १०.०० वाजता