मुंबई : ‘रंगभूमीच्या रूपरेखेचे भान ठेवून विषयांच्या चौकटी तोडणारे सादरीकरण हेच एकांकिका या प्रकाराचे वैशिष्ट्य आहे. सादरीकरण असो, पटकथेची मांडणी असो या संदर्भातील तथाकथित चौकटी भेदून नवे काहीतरी प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकांकिकेला दाद मिळतेच. त्यासाठी रूढ चौकटी मोडण्याची धमक ठेवूनच एकांकिकेची तयारी करायला हवी’ असा सल्ला अनुभवी रंगकर्मींनी ‘लोकसत्ता रंगसंवादा’तून युवा नाट्यकर्मींना दिला.
‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्यांना लवकरच सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत आपली एकांकिका उत्तम वठवण्यासाठी कंबर कसून तयारीला लागलेल्या महाविद्यालयीन तरुणाईला एकांकिकेच्या विषय निवडीपासून सादरीकरणापर्यंत कोणकोणत्या गोष्टीवर भर द्यायला हवा, काय टाळायला हवे आणि नेमके काय करायला हवे, याचे मौलिक मार्गदर्शन करणारा ‘रंगसंवाद’ हा वेबसंवाद मंगळवारी रंगला. प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक, अभिनेता अजित भुरे आणि प्रथितयश लेखक-दिग्दर्शक देवेंद्र पेम या दोन अनुभवी रंगकर्मींनी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊ शकेल अशी एकांकिका सादर करण्यासाठी पटकथा, नेपथ्य मांडणी, सादरीकरण अशा वेगवेगळ्या घटकांचा विचार कशा पद्धतीने करायला हवा, याचे मार्गदर्शन केले.
हेही वाचा >>>पुढील तीन महिने चांगल्या थंडीचे ? जाणून घ्या, थंडीला पोषक असणारी हवामानाची स्थिती
एकांकिकेच्या विषयातील विचार मांडता येणे गरजेचे
नाटक करताना सर्व पैलूंकडे निरखून पहिले जाते, त्याप्रमाणेच युवा रंगकर्मींनी एकांकिकेतील सर्व पैलूंकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. एकच विषय अनेकांकडून एकांकिकेत मांडला जाण्याची शक्यता असते, अशा वेळी त्या विषयातून (पान ८ वर)(पान १ वरून) आपल्याला नेमके काय पोहोचवायचे आहे, यावर अधिक भर द्यायला हवा. आपल्याला विषय मुळातून पटला असेल तर तो एकदा नव्हे अनेकदा लिहून काढावा, त्यावर प्रतिक्रिया घ्यावी, चर्चा करावी, सुधारणा करावी अशा अनेक स्तरांतून पटकथेवर संस्कार होतात, तेव्हा त्या मंथनातून एकांकिका घडत जाते. एकांकिकेच्या गरजेनुसार त्याची शैली निश्चित केली तर त्यातून अचूक परिणाम साधता येतो, असे मत देवेंद्र पेम यांनी व्यक्त केले.
नेपथ्य मांडणीची तालीम आवश्यक
अनेकदा एकांकिकांमध्ये भव्य नेपथ्य दिसून येते. नेपथ्य उभारणीमध्ये अनेक वस्तूंचा वापरही प्रभावी ठरू शकतो आणि नेमक्या वस्तूंच्या वापरातूनही परिणाम साधता येतो. मात्र तालमी करत असताना केवळ कलाकारांचा सराव करून उपयोग नाही. तर विंगेत असणाऱ्या आणि त्या त्या प्रसंगात रंगमंचावर नेपथ्यातील वस्तू उपलब्ध करून देणाऱ्यांचाही सराव होणे आवश्यक आहे. अनेकदा तो सराव नसल्याने रंगमंचावर गोंधळ उडतो, असे पेम यांनी सांगितले. तर एखादा अनुभवी कलाकार रंगमंचावरच्या अशा प्रसंगांना अभिनयाच्या जोरावर सावरून घेऊ शकतो, एकांकिका सादर करणाऱ्या नव्या कलाकारांचा गोंधळ उडतो, यासाठी नियोजनही चोख हवे, असे अजित भुरे यांनी सांगितले.
राज्यभरात पशूगणना सुरू, जाणून घ्या पशूगणनेची वैशिष्ट्ये
ऐनवेळी एकांकिकेत बदल करू नका
अनेकदा विविध पद्धतींच्या एकांकिका पाहून आणि इतरांच्या सूचना ऐकून प्रयोगाच्या काही दिवस आधी एकांकिकेत अचानक बदल केले जातात. अमुक पद्धतीची एकांकिका यशस्वी ठरली म्हणून त्या बाजाने आपली एकांकिका सादर करण्याकडे कल वाढतो. त्यामुळे मूळ सादरीकरणात गोंधळ होऊन एकांकिकेचा विषय नीट पोहोचत नाहीत.
नवे काहीतरी करण्याच्या नादात सादरीकरण फसण्याची शक्यता असल्याने ऐनवेळी सादरीकरणात बदल करणे टाळा, असा सल्ला भुरे यांनी दिला.
नवनवीन विषयांतून नव्या कथा निर्माण होतील
एकांकिका सादर झाल्यानंतर एकूण सादरीकरणापेक्षा कथा प्रेक्षकांच्या लक्षात राहते. त्यामुळे नवनवीन विषय घेणे आवश्यक आहे. नवनवीन विषय घेतले तरच नवीन कथा निर्माण होतील. विद्यार्थ्यांनी स्वत: निश्चितच लिहिले पाहिजे. तुम्ही लिहीत राहिलात, तर तुम्हाला वेगळे विषय सुचतील. कथाबीज शोधणे, कथाकथनाची शैली, त्याअनुषंगाने पटकथा लेखनाची शैली, प्रतिभा आणि गतीनुसार संहिता लिहिली जाते. संहितेचा मूळ मसुदा स्वत:च लिहायला हवा. तसेच एकांकिका करताना कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, हे आधी कळले तर अनावश्यक गोष्टी टाळता येतात, असे मत अजित भुरे आणि देवेंद्र पेम या दोघांनीही व्यक्त केले.
एखादी साधी गोष्टही उठावदार दिसते
गतवर्षी तुमच्या एकांकिकेला पारितोषिक मिळाले, तर पुन्हा त्याच बाजातील व तशाच पद्धतीने एकांकिका करू नका. संशोधन करत राहून नवनवीन पद्धतीने कसे सादरीकरण करता येईल, त्यावर भर द्या. विनोदी एकांकिकेला वा गंभीर विषयावरील एकांकिकेला पारितोषिक मिळते, असे ठोकताळे चुकीचे आहेत. एखादी साधी गोष्ट परिणामकारक पद्धतीने मांडली, तर ती प्रभावी होते, असे देवेंद्र पेम म्हणाले.
पुणे विभागीय प्राथमिक फेरी ३० नोव्हेंबर, १ डिसेंबर रोजी ‘लोकसत्ता लोकांकिका’साठी पुणे केंद्रातील महाविद्यालयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पुणे विभागीय प्राथमिक फेरी ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. तालीम स्वरूपात प्राथमिक फेरी रंगणार आहे. त्यामुळे उत्तम दर्जाचे सादरीकरण करून विभागीय अंतिम फेरीत स्थान मिळवण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची कसून तयारी सुरू आहे. विविध विषयांवरील एकांकिका या स्पर्धेत सादर केल्या जाणार आहेत.