मुंबई : एकांकिका स्पर्धेच्या वर्तुळात मानाचे स्थान निर्माण केलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या महाअंतिम सोहळ्याचे प्रसारण रविवारी, १० फेब्रुवारीला दुपारी एक वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवर केले जाणार आहे.
डिसेंबर, २०१८मध्ये रंगलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेला यंदाही भरघोस प्रतिसाद मिळाला होता. राज्यभरातून २०० हून अधिक महाविद्यालये यात सहभागी झाली होती. राज्यभरातील आठ केंद्रांवर पार पडलेल्या फेऱ्यांमधून प्रत्येक केंद्रावरील सर्वोत्तम आठ एकांकिकांची महाअंतिम फेरी १५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध अभिनेते मनोज वाजपेयी यांच्या प्रमुख उपस्थितीत माटुंग्याच्या यशवंत नाटय़गृहात रंगली होती. मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालय—आनंद भवनची ‘देव हरवला’, ठाण्यातील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाची ‘चौकट’, पुण्यातील फग्र्युसन महाविद्यालयाची ‘आशा’, नाशिकच्या एचपीटी, आर्ट्स आरवायके सायन्स महाविद्यालयाची ‘चलो सफर करे’, नागपूरच्या धनवटे नॅशनल महाविद्यालयाची ‘गटार’, औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नृत्यविभागाची ‘मादी’, कोल्हापूरच्या राजाराम बापू इन्स्टिटयमूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयाची ‘कस्तुरा’ आणि रत्नागिरीतील स. ह. केळकर महाविद्यालयाची ‘फुगडी’ या आठ एकांकिका महाअंतिम फेरीत दाखल झाल्या होत्या. यातील ‘मादी’ २०१८ची महाराष्ट्राची लोकांकिका ठरली. या सोहळयाचे प्रसारण ‘झी मराठी’वर १० फेब्रुवारीला केले जाणार आहे.
‘सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत’, ‘केसरी टूर्स’ आणि ‘पितांबरी’ सहप्रायोजित आणि पॉवर्ड बाय ‘इंडियन ऑइल कॉपरेरेशन लिमिटेड’ यांच्या सहकार्याने यंदाची ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे टॅलेन्ट हंट पार्टनर ‘आयरिस प्रॉडक्शन’ असून ‘एरेना मल्टिमीडिया’ने स्पर्धेचे नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहिले. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेसाठी ‘झी मराठी’ हे टेलिकास्ट पार्टनर आणि ‘एबीपी माझा’ हे न्यूज पार्टनर होते.