मुंबई : कल्पकता आणि वैशिष्ट्यपूर्ण मांडणीमुळे ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धेच्या मुंबई विभागीय प्राथमिक फेरीत लक्षवेधी एकांकिकांचे सादरीकरण झाले. वैविध्यपूर्ण आशयाला प्रयोगशीलतेची जोड, विविध सत्य घटनांवरून प्रेरित होऊन मानवी भावभावनांचा वेध घेणाऱ्या आणि सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या एकांकिकांमुळे मुंबई विभागीय प्राथमिक फेरी अत्यंत चुरशीची ठरली. प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या एकूण पाच एकांकिकांमध्ये मुंबई विभागीय अंतिम फेरी यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा रोड (पश्चिम) येथे शुक्रवार, १३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजल्यापासून रंगणार आहे.
प्राथमिक फेरीतील परीक्षकांच्या मार्गदर्शनाच्या अनुषंगाने आवश्यक बदल, एकांकिका प्रवाही ठेवण्यासाठी वारंवार संहितेचे वाचन, संवादाची उजळणी, तांत्रिक गोष्टींवर लक्ष आणि कसदार अभिनयावर भर देऊन मुंबई विभागीय अंतिम फेरी गाजवण्यासाठी महाविद्यालये सज्ज झाली आहेत. महर्षी दयानंद महाविद्यालयाची रोहित कोतेकर आणि रोहन कोतेकर लिखित – दिग्दर्शित ‘ब्रह्मपुरा’, सिडनहॅम महाविद्यालयाची मोहन बनसोडे लिखित आणि विजय पाटील दिग्दर्शित ‘अविघ्नेया’, रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाची रामचंद्र गावकर लिखित आणि दिग्दर्शित ‘जनतानगरचे लंगडे घोडे’, गुरू नानक खालसा महाविद्यालयाची सिद्धेश साळवी लिखित आणि आर्यन शिर्के व सिद्धेश साळवी दिग्दर्शित ‘जुगाड लक्ष्मी’ आणि सर ज. जी. कला, वास्तुकला आणि अभिकल्प विद्यापीठाची रोहन कोळी लिखित व दिग्दर्शित ‘पोर्ट्रेट’ या एकांकिका मुंबई विभागीय प्राथमिक फेरीत सादर होणार आहेत.
हेही वाचा : नाराज एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी, फडणवीस – शहा चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग
‘लोकसत्ता लोकांकिका’ मुंबई विभागीय प्राथमिक फेरीत युवा रंगकर्मींनी सभोवताली घडणाऱ्या सत्य घटनांना केंद्रस्थानी ठेवत सामाजिक विषयांवर भाष्य केले. तसेच वैविध्यपूर्ण आशय आणि कसदार अभिनयासह लेखन, दिग्दर्शन, संगीत, नेपथ्य आणि वेशभूषा आदी गोष्टीही लक्षवेधी होत्या. त्यामुळे यंदा मुंबई विभागीय अंतिम फेरीत महाविद्यालयांमध्ये चुरस रंगणार हे निश्चित असून कोणत्या महाविद्यालयाची एकांकिका अव्वल ठरून महाअंतिम फेरीत दाखल होते, याकडे नाट्यवर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सुबोध भावे आणि वैदेही परशुरामी यांची भेट
‘संगीत मानापमान’ या ११३ वर्षे जुन्या संगीत नाटकावर आधारित चित्रपट नवीन वर्षात १० जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. जिओ स्टुडिओजची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटात धैर्यधराची भूमिका साकारणारा अभिनेता सुबोध भावे आणि भामिनीच्या भूमिकेतील अभिनेत्री वैदेही परशुरामी हे दोघेही ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मुंबई विभागीय अंतिम फेरीच्या कार्यक्रमाला खास भेट देणार आहेत. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटानंतर सुबोध भावे यांनी पुन्हा एकदा ‘संगीत मानापमान’ या चित्रपटात दिग्दर्शन आणि अभिनय अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
नि:शुल्क प्रवेशिका; काही जागा निमंत्रितांसाठी राखीव
‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेची मुंबई विभागीय अंतिम फेरी शुक्रवार, १३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजल्यापासून माटुंगा रोड (पश्चिम) येथील यशवंत नाट्य मंदिर येथे रंगणार आहे. याच ठिकाणी रसिकप्रेक्षकांना नि:शुल्क प्रवेशिका विभागीय अंतिम फेरी सुरू होण्याच्या अर्धा तास आधी देण्यात येतील. एका व्यक्तीला एकच प्रवेशिका देण्यात येईल, तर काही जागा निमंत्रितांसाठी राखीव असतील.
हेही वाचा : Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
प्रायोजक
●मुख्य प्रायोजक : जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण
●सहप्रस्तुती : सॉफ्ट कॉर्नर
●सहप्रायोजक : झी टॉकीज, केसरी टूर्स, भारती विद्यापीठ
●पॉवर्ड बाय : एन एल दालमिया, फ्यूजनफ्लिक्स
●साहाय्य : अस्तित्व
●टॅलेंट पार्टनर : आयरिस प्रोडक्शन्स