‘लोकसत्ता लोकांकिका’ बहुमान मिळवण्यासाठी विभागीय अंतिम फेरीच्या मांडवाखालून जावे लागणार आहे. प्रत्येक विभागातून सर्वोत्कृष्ट ठरणारी एक एकांकिका अशा आठ विभागांच्या आठ एकांकिकांमध्ये महाअंतिम फेरीत चुरस रंगणार आहे. त्यामुळे विभागीय अंतिम फेरीचे आव्हान जिंकण्यासाठी युवा रंगकर्मींची कसून तयारी सुरू आहे. मुंबई आणि ठाणे येथील विभागीय अंतिम फेरीत पोहोचलेल्या महाविद्यालयांमध्ये सध्या दिवसरात्र तालमी सुरू आहेत.
गेली आठ वर्षे नाट्यवर्तुळात आणि महाविद्यालयीन युवा रंगकर्मींच्या मनात ‘लोकसत्ता लोकांकिका’ या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेने आपले भक्कम स्थान निर्माण केले आहे. दरवर्षी लोकांकिका स्पर्धेची वाट पाहणारे, या स्पर्धेत नवनवीन विषयांवरची एकांकिका सादर करण्यासाठी विद्यार्थी उत्सुक असतात. यंदाही प्राथमिक फेरीचे आव्हान पूर्ण करून ठाणे आणि मुंबई दोन्ही विभागांत पाच महाविद्यालयांच्या एकांकिका विभागीय अंतिम फेरीत दाखल झाल्या आहेत. मुंबई विभागीय अंतिम फेरी शुक्रवारी, १३ डिसेंबरला होणार असून ठाणे विभागीय अंतिम फेरी १४ डिसेंबरला रंगणार आहे. अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकांकिका विभागीय अंतिम फेरीमुळे एकूणच महाविद्यालयीन वातावरणात ‘लोकांकिका’चे चैतन्य संचारले आहे.
हेही वाचा : ‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
मुंबई आणि ठाणे या दोन्ही विभागांत सादर झालेल्या एकांकिकांमधील विषयवैविध्य आणि नेपथ्य-आशय मांडणीच्या दृष्टीने केलेले प्रयोग यामुळे एकंदरीतच उत्कंठा वाढली आहे. जातीय वादावरचे भाष्य, ‘डाऊन सिंड्रोम’ मानसिक अपंगत्व असलेल्या तरुण-तरुणीच्या लग्नाची गोष्ट, मुंबईतील विविध चाळी व जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना धनदांडग्या विकासकांकडून वेठीस धरण्याचे घडणारे प्रकार, मुलाच्या हट्टापायी बापाने केलेल्या जुगाडाची गोष्ट , जुन्या काळातील प्रेमकथेची दीर्घकवितेच्या रूपातली मांडणी, व्यक्तीला आपली ओळख सिद्ध करण्यासाठी लागणारी वेगवेगळी कागदपत्रे असे वेगवेगळे विषय ठाणे – मुंबईतील महाविद्यालयांनी एकांकिकांमधून सादर केले. या एकांकिका सादर करण्यासाठी नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत आदी बाबींचा कशा पद्धतीने कल्पक वापर करायला हवा याची विद्यार्थ्यांना चांगली जाण आहे हेही या सादरीकरणातून लक्षात आले. त्यामुळे लेखनापासून तंत्रापर्यंत सगळ्याच बाबतीत सरस असलेल्या या एकांकिकांमध्ये सर्वोत्तम कोण ठरणार आणि महाअंतिम फेरीत जाण्याची संधी कोणत्या एकांकिकेला मिळणार? याची उत्कंठा नाट्यप्रेमींमध्येही आहे.
विभागीय अंतिम फेरीचे स्पर्धक
मुंबई विभागीय अंतिम फेरीत गुरु नानक खालसा स्वायत्त महाविद्यालयाची ‘जुगाड लक्ष्मी’, महर्षी दयानंद महाविद्यालयाची ‘ब्रह्मपुरा’, सिडनहॅम महाविद्यालयाची ‘अविघ्नेया’, रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाची ‘जनता नगरचे लंगडे घोडे’ आणि सर ज. जी. कला, वास्तुकला आणि अभिकल्प विद्यापीठाची ‘पोर्ट्रेट’ अशा पाच एकांकिकांमध्ये महाअंतिम फेरीत जाण्यासाठी चुरस रंगणार आहे. तर ठाणे विभागीय अंतिम फेरीत ज्ञानसाधना महाविद्यालयाची ‘कुक्कुर’, जोशी-बेडेकर महाविद्यालयाची ‘क्रॅक्स इन द मिरर’, एनकेटी महाविद्यालयाची ‘रेशन कार्ड’ तर, पनवेलमधील सीके ठाकूर महाविद्यालयाची ‘वेदना सातारकर – हजर सर’ आणि उल्हासनगरमधील एसएसटी महाविद्यालयाची ‘ऑपरेशन’ या एकांकिकांमध्ये महाअंतिम फेरीत जाण्यासाठी चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी प्रयत्नशील
कलाक्षेत्रात सर ज. जी. कला महाविद्यालयाची उज्ज्वल परंपरा आहे. कलेबरोबरच नाट्यकलेला वाव देणाऱ्या विशेषत: नेपथ्यरचना, संगीत अशा नानाविध बाबींवर विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळावी, यासाठी स्पर्धेतील सहभाग महत्त्वाचा ठरतो. विद्यार्थी कलामंडळांच्या माध्यमातून प्रयत्न करतात, शिक्षकही त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा यासाठी प्रयत्नशील असतात. यंदा ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेचे उत्तम व्यासपीठ आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या एकांकिकेचा विभागीय अंतिम फेरीत प्रवेश असा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. विद्यार्थ्यांनी ज. जी. महाविद्यालयाची परंपरा पुढे सुरू ठेवली आहे, हे उद्याचे कलाकार आज घडत आहेत, याचाही अभिमान वाटतो.
- डॉ. रजनीश कामत, कुलगुरू (सर ज. जी. कला, वास्तुकला आणि अभिकल्प विद्यापीठ, मुंबई)
हेही वाचा : पाच वर्षांत पन्नास हजार एकर द्राक्ष लागवड क्षेत्रात घट, उत्पादन खर्च वाढल्याने अन्य पिकांकडे कल
महाविद्यालयाच्या मार्गदर्शनाची जोड
‘लोकसत्ता लोकांकिका’ हे एक मानाचे व्यासपीठ आहे. त्यासाठी आमचे विद्यार्थी दरवर्षी नव्या उमेदीने तयारीला लागतात. आमच्या महाविद्यालयातून नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेणारे अनेक विद्यार्थी आज अभिनय क्षेत्रात नावाजलेले कलाकार आहेत. यशस्वी कलाकार घडवण्याची ही परंपरा अजूनही कायम आहे. दरवर्षी विद्यार्थी एकांकिकेसाठी वेगवेगळे विषय घेऊन येतात, यावर त्यांना महाविद्यालय नेहमी मार्गदर्शन करत असते. आमचे माजी विद्यार्थी जे व्यावसायिक स्तरावर काम करतात, त्यांचेही मार्गदर्शन मुलांना मिळत असल्याने सादरीकरणाची गुणवत्ता वाढण्यास मदत होते. याचबरोबर यंदाच्या एकांकिकेसाठी आम्ही ध्वनिमुद्रित संगीत वापरण्याऐवजी प्रत्यक्ष रंगमंचावर गायन-वादन करत संगीत देणार आहोत.
- डॉ. हेमंत शर्मा, प्राचार्य (महर्षी दयानंद महाविद्यालय, मुंबई)
नवनवीन विषयप्रयोगासाठी आग्रही
एकांकिका स्पर्धा म्हणजे फक्त रंगमंचावरचे सादरीकरण नसून ती एकांकिका लिहिण्यापासून प्रत्यक्ष साकार होताना त्यातील प्रत्येक टप्पा अनुभवण्याची ‘प्रक्रिया’ आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आपल्या गुणांचे प्रदर्शन करण्यासाठीचा उत्तम मंच आहे यात शंकाच नाही. प्राथमिक फेरीच्या आधी नाट्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या दोन कार्यशाळा वेबसंवादाच्या माध्यमातून ‘लोकसत्ता’ने आयोजित केल्या होत्या, त्यांचाही विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा झाला आहे. रुईया महाविद्यालय कायमच नवनवीन विषय समोर आणणे आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रयोग करायची संधी देणे यासाठी आग्रही असतेच. लोकांकिका उपक्रमासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.
- डॉ. अनुश्री लोकूर, प्राचार्य (रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय)
संवेदनशील विद्यार्थी घडवण्यावर भर
एकांकिका स्पर्धेसाठी विद्यार्थी खूप मेहनत घेतात. त्यांना ‘लोकसत्ता’ने वेगळे विषय मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही मोठी गोष्ट आहे. यंदाच्या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी वेगळ्या विषयावरची एकांकिका सादर केली आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने महाविद्यालय उपक्रम घेतेच, मात्र त्यांना सैद्धांतिक ज्ञानाबरोबरच अनुभवातून ज्ञानार्जन व्हावे यावर आमचा भर असतो. एकांकिकांमुळे एखाद्या विषयाकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून पाहण्याची सवय मुलांना लागते. एकांकिका बसवण्याच्या निमित्ताने समूहाने काम करण्याचे कौशल्य, शिस्त, वेळेचे व्यवस्थापन, रंगमंचावर निडरपणे स्वत:ला सादर करण्याचा आत्मविश्वास असे अनेक गुण विकसित होत असतात. त्यामुळे अधिकाधिक कला उपक्रमांमध्ये सहभाग घ्यावा, यासाठी महाविद्यालय आग्रही असते.
- डॉ. श्रीनिवास धुरे, प्राचार्य (सिडनहॅम वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय)
हेही वाचा : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई; ४२६ रिक्षा जप्त
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीसुद्धा सी. के. ठाकूर (स्वायत्त) महाविद्यालयाची ठाणे विभागीय अंतिम फेरीत निवड झाली आहे. शिक्षणाबरोबरच इतर उपक्रमांत सहभागी होण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही स्पर्धा संपूर्ण राज्यभरात आयोजित केली जात असल्याने या स्पर्धेत उत्तम कला सादर करण्याचे आव्हान विद्यार्थ्यांपुढे असते. ठाणे विभागीय फेरीमधून महाअंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी मेहनत करत आहेत, त्यामुळे त्यांना नक्की यश मिळेल.
- डॉ. एस. के. पाटील, प्राचार्य (सी . के. ठाकूर महाविद्यालय, पनवेल)
अभ्यासाबरोबरच कलेतही नैपुण्य
खालसा महाविद्यालय कलाक्षेत्रातही कायम अग्रेसर राहिले आहे. गेल्या वर्षी महाविद्यालयाने सादर केलेल्या एकांकिकेला अनेक प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धांमध्ये पुरस्कार मिळाले आहेत. यंदा महाविद्यालयाने सादर केलेली एकांकिकासुद्धा संहिता, अभिनय, संवाद याबाबतीत सरस आहे, त्यामुळे याही एकांकिकेसाठी विद्यार्थी विविध विभागांत पुरस्कार मिळवतील, असा विश्वास वाटतो. विद्यार्थी अभ्यास सांभाळून एकांकिका स्पर्धेची तयारी करतात हे विशेष. उत्तम सादरीकरणासाठी रात्रंदिवस ते तालमी करत आहेत. यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रमांची गरज असते, हे लक्षात घेऊन मोठ्या परिश्रमाने कलाक्षेत्रातही धडपडणारे विद्यार्थी कौतुकास पात्र आहेत.
- डॉ. रत्ना शर्मा, प्राचार्या (गुरु नानक खालसा महाविद्यालय)
विद्यार्थ्यांच्या मेहनतीचायशाचा अभिमान
विद्यार्थ्यांनी मागील वर्षी स्वत:हून ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत सहभागी होण्याची तयारी दाखवली होती. स्पर्धेत सहभागी झाल्या झाल्या पहिल्यांदाच ‘आक्का’ या एकांकिकेची ठाणे विभागीय अंतिम फेरीत निवड झाली. एका विद्यार्थिनीला उत्कृष्ट अभिनयासाठी पारितोषिकही मिळाले होते, त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह अधिक वाढला. यंदा ‘रेशनकार्ड’ ही एकांकिका महाविद्यालयाकडून सादर करण्यात आली. सध्या प्रत्येकाचे आधारकार्ड, पॅनकार्ड हे वैयक्तिक ओळखीचे पुरावे आहेत. आपल्या कुटुंबाची ओळख ही रेशनकार्डामुळेच होते, अशा आशयाचा विषय एकांकिकेतून मांडण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला आहे. प्राचार्य या नात्याने विद्यार्थी घेत असलेली मेहनत आणि त्यांना मिळालेल्या यशाचा अभिमान वाटतो.
- डॉ. दिलीप पाटील, प्राचार्य (एन के टी महाविद्यालय, ठाणे)
अंतिम फेरीची प्रतीक्षा
‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या ठाणे विभागीय फेरीत एस. एस. टी. महाविद्यालयाच्या एकांकिकेची निवड झाली ही अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक आणि कलात्मक प्रयत्नांमध्ये उत्कृष्टत्व सिद्ध केले आहे. या व्यासपीठाचा भाग होणे ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. आम्ही मोठ्या उत्साहाने अंतिम फेरीची वाट पाहत आहोत.
- डॉ. पुरस्वानी, प्राचार्य (एस एस टी महाविद्यालय, उल्हासनगर)
माजी विद्यार्थ्यांची मदत
स
महाविद्यालयाच्या वतीने नेहमी विद्यार्थ्यांचे प्रयत्न आणि त्यांच्या जिद्दीला महत्त्व दिले जाते. गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी ठाणे विभागातून विजेते होत आहेत. अंतिम फेरीत निवड व्हावी, यासाठी या क्षेत्रातील यशस्वी माजी विद्यार्थ्यांकडूनही मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची तालीम सुरू आहे. विद्यार्थ्यांना लागेल ती मदत महाविद्यालयाच्या वतीने केली जात आहे. त्याचप्रमाणे त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्याबरोबर सतत संवादही सुरू आहे.
- डॉ. गणेश भगुरे, प्राचार्य ( सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे)
हेही वाचा : कुर्ला अपघात प्रकरणः बसमधील सीसीटीव्ही ताब्यात, २५ जणांचा जबाब नोंदवला
विद्यार्थ्यांची एकसंध मेहनत
जोशी बेडेकर महाविद्यालय
‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’ आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा हा लोकाभिमुख कार्यक्रम असून तरुणांना जोडणारा उपक्रम आहे. भरपूर वाचन, अभ्यास तसेच माणसांचा अभ्यास, जीवनव्यवहाराचा अभ्यास ही जेव्हा नाट्यप्रेमींची सवय होते, तेव्हा उत्तम, दर्जेदार कलाकृती आकार घेते. स्पर्धा म्हणून सादरीकरण न करता, नाटकवेडे म्हणून विद्यार्थ्यांना राहता आले पाहिजे.
- डॉ. सुचित्रा नाईक, प्राचार्या ( जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणे)
प्रायोजक
●मुख्य प्रायोजक : जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण
●सहप्रस्तुती : सॉफ्ट कॉर्नर
●सहप्रायोजक : झी टॉकीज, केसरी टूर्स, भारती विद्यापीठ
●पॉवर्ड बाय : एन एल दालमिया, फ्यूजनफ्लिक्स
●साहाय्य : अस्तित्व