राज्यातील नाटय़स्पर्धाच्या मंचावर गतवर्षी आपली दमदार पताका फडकाविणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेचे दुसरे पर्व येत्या २९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. महाविद्यालयीन तरुणाईच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या स्पर्धेची प्राथमिक फेरी गतवर्षीप्रमाणेच यंदाही मुंबई, ठाणे, पुणे, नगर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, रत्नागिरी अशा आठ केंद्रांवर होणार आहे. या केंद्रांतून प्रथम येणाऱ्या एकांकिकांना मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीत प्रवेश मिळेल.
गावोगावच्या अलक्षित कलाकारांतील कलागुण यानिमित्ताने मुंबई-पुण्याच्या रसिकांसमोर येतीलच; त्याचबरोबर मराठी रंगभूमीवरील दिग्गज नाटय़कर्मीच्या शास्त्रकाटय़ाच्या कसोटीवर उतरण्याची संधीही तरुणाईला प्राप्त होणार आहे. ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा अमीट ठसा नाटय़क्षेत्रात उमटवला आहे अशांचे मार्गदर्शन यानिमित्ताने त्यांना उपलब्ध होणार आहे. या स्पर्धेतून केवळ नाटय़क्षेत्राचेच दरवाजेच उघडणार नाहीत, तर टीव्ही मालिकांचे विशाल नभांगणही गुणी कलाकारांना खुले होणार आहे.
१८ ऑक्टोबपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेतील प्रवेशासाठीची पत्रे गेल्या वर्षी या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या महाविद्यालयांना याआधीच रवाना झाली आहेत. महाविद्यालयीन परीक्षा वगैरेंच्या जंजाळात अडकण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना त्यांच्या मुक्त कलाविष्काराला वाव देता यावा याकरीता ही स्पर्धा यंदा तुलनेने लवकर आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेच्या फेऱ्यांचा सविस्तर तपशील, प्रवेशाची नियमावली आदी बाबी ‘लोकसत्ता’मधून तसेच ‘लोकसत्ता ऑनलाईन’ आवृत्तीतून लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.
गेल्या वर्षी ‘लोकसत्ता’च्या लोकांकिका स्पर्धेच्या आयोजनाचे पहिलेच वर्ष असूनही विषय, आशय आणि सादरीकरणात ‘प्रयोग’ केलेल्या अनेक उत्तमोत्तम एकांकिका स्पर्धेत सादर झाल्या. या उपक्रमाचे नाटय़क्षेत्रातील नामवंतांनी तर स्वागत केलेच; लोकसत्ताच्या वाचकांनीही त्यास भरभरून प्रतिसाद दिला. इतका, की महाअंतिम फेरीत उदंड गर्दीमुळे अनेकांना जागेअभावी निराश होऊन घरी परतावे लागले होते. त्यामुळे यंदा जास्तीत जास्त रसिकांना ‘लोकांकिका-२०१५’मधील निवडक विजेत्या एकांकिका पाहता याव्यात म्हणून नंतर त्यांचे खास सादरीकरणही करण्यात येणार आहे.
मालिकांच्या नभांगणात ‘लोकांकिका तारे’
२०१४ मध्ये पहिल्याच वर्षी ‘लोकांकिका स्पर्धे’ला महाराष्ट्रभरातून महाविद्यालयांचा उदंड प्रतिसाद मिळाला. काहींनी तर दोन-दोन, तीन-तीन एकांकिका स्पर्धेत उतरविण्याची तयारी दर्शविली. शंभरावर एकांकिकांचे सादरीकरण प्राथमिक फेरीत झाले. त्यातून त्या त्या केंद्रांवर आयोजित करण्यात आलेल्या अंतिम फेरीत अनेकांनी आपल्या यशाचे झेंडे रोवले. महाअंतिम फेरीत पोहोचून त्यांनी मुंबई-पुण्यातील तगडय़ा प्रतिस्पध्र्याना आव्हान दिले. नुसते आव्हान देऊनच ते थांबले नाहीत, तर त्यातल्या काहींनी व्यक्तिगत आणि सांघिक जेतेपदालाही गवसणी घातली.
*****
दूरचित्रवाणीवरील मालिका निर्मिती क्षेत्रातील ‘आयरिस प्रॉडक्शन्स’ या संस्थेने ‘लोकांकिका- २०१४’मधील काही गुणवंत रंगकर्मीची निवड केली होती. त्या कलाकारांना मालिकांमध्ये चमकण्याची संधी देण्यात आली असून, मालिकांच्या नभोमंडलात अवतरलेल्या या नव्या ताऱ्यांचा हा सर्व प्रवास, त्यांचे प्रत्यक्षानुभव ‘लोकसत्ता’मधून लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.