मुंबई : वैविध्यपूर्ण विषयांना प्रयोगशीलतेची जोड आणि कल्पकतेच्या जोरावर वैशिष्ट्यपूर्ण मांडणी, मानवी भावभावनांचा वेध आणि राजकीय – सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या दर्जेदार एकांकिकांना प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळवत ‘लोकसत्ता लोकांकिका’ची मुंबई विभागीय अंतिम फेरी रंगली. सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा बहुमान पटकावून सिडनहॅम महाविद्यालयाच्या ‘अविघ्नेया’ या एकांकिकेने महाअंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
लक्षवेधी व चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत सिडनहॅम महाविद्यालयाच्या ‘अविघ्नेया’ एकांकिकेने बाजी मारून महाअंतिम फेरी गाठली. महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या ‘ब्रह्मपुरा’ या एकांकिकेने द्वितीय आणि गुरू नानक खालसा महाविद्यालयाच्या ‘जुगाड लक्ष्मी’ या एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकावला. लेखन, अभिनय, संगीत, वेशभूषा या वैयक्तिक पारितोषिकांवर रुईया महाविद्यालयाच्या जनता नगरचे ‘लंगडे घोडे’ या एकांकिकेमधील कलाकारांचे वर्चस्व राहिले.
हेही वाचा : मंत्र्यांची संख्या, खात्यांवरून घोळ; रखडलेला शपथविधी उद्या नागपूरमध्ये?
मुंबई विभागीय अंतिम फेरीचे परीक्षण लेखक, अभिनेते व दिग्दर्शक संतोष पवार आणि लेखिका व अभिनेत्री डॉ. श्वेता पेंडसे यांनी केले. परीक्षकांसह लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, सॉफ्ट कॉर्नरचे दिलीप कुलकर्णी, ‘संगीत मानापमान’ चित्रपटाचे दिग्दर्शक व अभिनेते सुबोध भावे आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने अंतिम फेरीची सुरुवात झाली. परीक्षक, अस्तित्वचे रवी मिश्रा आणि मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
‘लोकसत्ता लोकांकिका’ची मुंबई विभागीय अंतिम फेरी पाहण्यासाठी प्रेक्षकांनी दुपारी २ वाजल्यापासूनच यशवंत नाट्य मंदिर येथे गर्दी केली होती. सादरीकरणाइतकेच विद्यार्थ्यांचे पडद्यामागील नियोजन, खिलाडूवृत्ती यांनीही दाद मिळवली.
सुबोध भावे, वैदेही परशुरामी यांची उपस्थिती
‘संगीत मानापमान’ या ११३ वर्षे जुन्या संगीत नाटकावरून प्रेरित होऊन आधारित चित्रपट नवीन वर्षात १० जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. जिओ स्टुडिओजची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटात धैर्यधराची भूमिका साकारणारे अभिनेते सुबोध भावे आणि भामिनीच्या भूमिकेतील अभिनेत्री वैदेही परशुरामी या कलाकारांनी ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या मुंबई विभागीय अंतिम फेरीसाठी उपस्थित राहत युवा रंगकर्मींचा उत्साह द्विगुणित करत त्यांना मार्गदर्शन केले.
स्पर्धेतील यश अपयश याचा विचार करण्यापेक्षा नाटक करत राहणे महत्त्वाचे असते, असे मत अभिनेते सुबोध भावे यांनी व्यक्त केले. एकांकिका आणि माझे एक घनिष्ठ नाते आहे. त्यातूनच शिकत मी आज इथपर्यंत आलो आहे. कोणत्याही यशाची अपेक्षा न ठेवता सातत्य ठेवणे गरजेचे असते. प्रकाशयोजना, संगीत आणि नेपथ्य यावर काम करताना प्रामुख्याने भाषेवरही विशेष लक्ष देणे गरजेचे असेही त्यांनी सांगितले.
●सर्वोत्तम दिग्दर्शक : रोहित कोतेकर, रोहन कोतेकर (ब्रह्मपुरा)
●सर्वोत्कृष्ट लेखक : रामचंद्र गांवकर (जनता नगरचे लंगडे घोडे)
●सर्वोत्कृष्ट अभिनय : प्रथम (चेतन वाघ, बटर) शुभम लवंगारे (पाव) जनता नगरचे लंगडे घोडे
●सर्वोत्कृष्ट अभिनय : द्वितीय – श्रावणी ओव्हाळ (अनन्या) यश वर्तक (विघ्नेश) – अविघ्नया
●सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार : यश पवार ( ब्रह्मपुरा)
●सर्वोत्कृष्ट संगीत : श्रीनाथ म्हात्रे, केतन चौधरी (जनता नगरचे लंगडे घोडे)
●सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना : श्याम चव्हाण ( ब्रह्मपुरा)
●लक्षवेधी वेशभूषा : तृषाला नायक ( जनता नगरचे लंगडे घोडे)
उत्तेजनार्थ अभिनय प्रशस्तीपत्रक
●स्वप्निल पाटील : गौतम – ब्रह्मपुरा
●पूजा कोकाटे : आजी – जुगाड लक्ष्मी
●श्रीयश वावळीये : तुकाराम – पोर्ट्रेट
प्रायोजक
●मुख्य प्रायोजक : जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण
●सहप्रस्तुती : सॉफ्ट कॉर्नर
●सहप्रायोजक : झी टॉकीज, केसरी टूर्स, भारती विद्यापीठ
●पॉवर्ड बाय : एन एल दालमिया, फ्यूजनफ्लिक्स
●साहाय्य : अस्तित्व
●टॅलेंट पार्टनर : आयरिस प्रोडक्शन्स