मुंबई : युवा रंगकर्मींमधील कल्पनाशक्तीला चालना देणारी आणि त्यांना कलाक्षेत्रातील व्यावसायिक संधींची कवाडे खुली करून देणारी ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धा यंदाही चुरशीची ठरली. हा दर्जेदार नाट्यानुभव प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता येणार आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीतील तीन विजेत्या एकांकिका आणि जेएनपीटीच्या एकांकिकेचा ‘नाट्योत्सव’ शनिवार, ४ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता उरण येथील जे. एन. पी. टी. टाऊनशिपच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
यंदा सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, अभिनय या वैयक्तिक पारितोषिकांवर कोल्हापूर विभागातील इस्लामपूर येथील राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘व्हाय नॉट?’ या एकांकिकेने विजयी मोहोर उमटवत ‘महाराष्ट्राची लोकांकिका’ होण्याचा बहुमान पटकावला. रत्नागिरी विभागातील देवगड येथील श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाच्या ‘मशाल’ या एकांकिकेने द्वितीय आणि पुण्यातील आयएमसीसी महाविद्यालयाच्या ‘सखा’ या एकांकिकेने तृतीय पारितोषिक पटकावले. या सर्वोत्कृष्ट तीन एकांकिका आणि अ. भा. पोर्ट प्राधिकरण स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या ‘चंदा’ या एकांकिकेचे ‘नाट्योत्सव’मध्ये सादरीकरण होणार आहे. वैविध्यपूर्ण आशयाला प्रयोगशीलतेची जोड देत, कल्पनेच्या भराऱ्या घेत आणि सभोवताली घडणाऱ्या घडामोडींची जाणीव ठेवत युवा रंगकर्मींनी (पान ५ वर) (पान १ वरून) ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेमध्ये एकांकिकांचे सादरीकरण केले होते. तसेच वैशिष्ट्यपूर्ण तांत्रिक गोष्टींनीही रसिकप्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. हा दर्जेदार नाट्याविष्कार रसिकप्रेक्षकांना पुन्हा एकदा नवी मुंबईत ४ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या नाट्योत्सवच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे.
हेही वाचा : Sameer Wankhede : समीर वानखेडे आर्यन खान प्रकरणाबाबत म्हणाले, “मला जर संधी मिळाली तर मी पुन्हा…”
सुबोध भावेंची प्रमुख उपस्थिती
जुन्या संगीत नाटकावरून प्रेरित असलेला ‘संगीत मानापमान’ हा चित्रपट १० जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. जिओ स्टुडिओजची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी धैर्यधराची आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांनी भामिनीची भूमिका साकारली आहे. यानिमित्ताने आणि युवा रंगकर्मींच्या रंगमंचीय आविष्काराला दाद देण्यासाठी सुबोध भावे ‘नाट्योत्सवा’ला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा : देशाच्या तापमानात ०.६५ अंश सेल्सिअसने वाढ जाणून घ्या, २०२४ मधील देशाच्या हवामान क्षेत्रातील घडामोडी
प्रायोजक
● मुख्य प्रायोजक : जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण
● सहप्रस्तुती : सॉफ्ट कॉर्नर
● सहप्रायोजक : झी टॉकीज, केसरी टूर्स, भारती विद्यापीठ
● पॉवर्ड बाय : एन एल दालमिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अॅण्ड रिसर्च, फ्यूजनफ्लिक्स, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड
● साहाय्य : अस्तित्व
● टॅलेंट पार्टनर : आयरिस प्रोडक्शन्स
© The Indian Express (P) Ltd