मुंबई : राज्यातील युवा रंगकर्मींना जोडणाऱ्या आणि नाट्यवर्तुळात चर्चेच्या ठरलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दर्जेदार एकांकिका पुन्हा पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. या रंगमंचीय आविष्काराला दाद देण्यासाठी अभिनेते सुबोध भावे यांची विशेष उपस्थिती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उरण येथील जेएनपीए टाऊनशिपच्या बहुद्देशीय सभागृहात शनिवार, ४ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता सर्वोत्कृष्ट एकांकिकांचा ‘नाट्योत्सव’ होणार असून ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीतील तीन सर्वोत्कृष्ट एकांकिका आणि जेएनपीएची एकांकिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा : मुंबई : ॲण्टॉप हिल येथे दहा शौचालये जाळली, पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

यंदा सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, अभिनय या वैयक्तिक पारितोषिकांवर कोल्हापूर विभागातील इस्लामपूर येथील राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘व्हाय नॉट?’ या एकांकिकेने विजयी मोहोर उमटवत ‘महाराष्ट्राची लोकांकिका’ होण्याचा बहुमान पटकावला. रत्नागिरी विभागातील देवगड येथील श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाच्या ‘मशाल’ या एकांकिकेने द्वितीय आणि पुण्यातील आयएमसीसी महाविद्यालयाच्या ‘सखा’ या एकांकिकेने तृतीय पारितोषिक पटकावले. या सर्वोत्कृष्ट तीन एकांकिका आणि अ. भा. पोर्ट प्राधिकरण स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेती ‘चंदा’ ही एकांकिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाला ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर प्रवेश देण्यात येणार असून काही जागा निमंत्रितांसाठी राखीव आहेत.

विविधांगी विषयांवर आधारित दर्जेदार एकांकिकांचे सादरीकरण, कसदार अभिनय, लक्षवेधी ठरणाऱ्या तांत्रिक बाजू असा नाट्यमय माहौल नाट्योत्सवाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता येणार आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीतील तीन विजेत्या एकांकिका आणि जेएनपीएच्या एकांकिकेचा ‘नाट्योत्सव’ उरण येथील जेएनपीए टाऊनशिपच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

हेही वाचा : अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा

सुबोध भावे यांची उपस्थिती

‘संगीत मानापमान’ या जुन्या संगीत नाटकावरून प्रेरित होऊन ‘संगीत मानापमान’ हा चित्रपट १० जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. जिओ स्टुडिओजची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी धैर्यधराची भूमिका आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांनी भामिनीची भूमिका साकारली आहे. विशेष बाब म्हणजे अभिनयासह दिग्दर्शन ही महत्त्वाची जबाबदारीही सुबोध भावे यांनी सांभाळली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आणि युवा रंगकर्मींच्या रंगमंचीय आविष्काराला दाद देण्यासाठी सुबोध भावे हे नाट्योत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून युवा रंगकर्मींशी संवादही साधणार आहेत.

प्रायोजक

● मुख्य प्रायोजक : जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण

● सहप्रस्तुती : सॉफ्ट कॉर्नर

● सहप्रायोजक : झी टॉकीज, केसरी टूर्स, भारती विद्यापीठ

● पॉवर्ड बाय : एन एल दालमिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अॅण्ड रिसर्च, फ्यूजनफ्लिक्स, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड

● साहाय्य : अस्तित्व

● टॅलेंट पार्टनर : आयरिस प्रोडक्शन्स

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta lokankika top performers will perform again today at uran jnpt hall css