मुंबई आणि ठाण्यातील यशस्वी कार्यक्रमांनंतर आता महामुंबईतील विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग दाखविण्यासाठी लोकसत्तातर्फे येत्या ३ आणि ४ जून रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाटय़गृहात ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी, समुपदेशक विवेक वेलणकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. याचबरोबर कार्यक्रमात पुढील वर्षी वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘नीट’ या पात्रता परीक्षेबाबतही एस. के. सोमय्या महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विषयाचे विभागप्रमुख प्रा. नागेश सावंत विशेष मार्गदर्शन करणार करणार आहेत.
वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘नीट’ द्यावी लागणार ही आता काळ्या दगडावरची रेघ झाली आहे. त्यामुळे या परीक्षेवरून सुरू झालेला सामायिक गोंधळ संपला असली तरी या परीक्षेच्या नेमक्या स्वरूपाची माहिती अद्याप विद्यार्थ्यांना अवगत झालेली नाही. त्यामुळे या ‘नीट’ परीक्षेत नेमके काय दडले आहे याची गुपिते ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यक्रमात पहिल्यांदाच उलगडली जाणार आहेत. या ‘नीट’ सामायिक परीक्षेच्या इत्थंभूत माहितीसह ताणमुक्त व्यक्तिमत्त्व विकासापासून ते विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींपर्यंतचा प्रवास सुकर करण्यासाठीचा या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांसमोर खुला होणार आहे. याचबरोबर दहावी आणि बारावीनंतर विविध करिअरच्या पर्यायांची माहितीही या कार्यक्रमांतून विविध वक्ते करून देणार आहेत. आयुक्त तुकाराम मुंडे प्रशासकीय सेवेतील संधी त्यांच्या अनुभवातून उलगडणार असून तणावमुक्त व्यक्तिमत्त्व घडविताना नेमकी काय काळजी घ्यायची याबाबत डॉ. आनंद नाडकर्णी मार्गदर्शन करणार आहेत. दोन्ही दिवशी कार्यक्रम सकाळी ९.३० वाजता सुरू होणार आहे.
प्रवेशिका मिळण्याचे ठिकाण
‘अॅमिटी युनिव्र्हसिटी’ने प्रेझेंट केलेल्या व ‘विद्यालंकार क्लासेस’च्या सहकार्याने होत असलेल्या या कार्यक्रमाला पॉवर्डबाय म्हणून ‘दिलकॅप महाविद्यालय’, ‘रोबोमेट’, ‘एलटीए’ आणि ‘सास्मिरा’ आहेत. याचबरोबर या कार्यक्रमाला नवी मुंबई महानगरपालिकेचे विशेष सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका रविवार, २९ मेपासून विष्णुदास भावे नाटय़गृह, वाशी आणि विद्यालंकार क्लासेस, शिव पार्वती शॉपिंग कॉम्प्लेक्स, नेरुळ रेल्वे स्थानकाच्या समोर, सेक्टर २१, नेरुळ (पूर्व) या ठिकाणी सकाळी १० ते संध्याकाळी ६ यावेळात उपलब्ध होतील. याचबरोबर प्रवेशिका https://in.bookmyshow.com/mumbai या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहिती संपर्क – ६७४४०३४७ किंवा ६७४४०३६९.
इतर विषय आणि मार्गदर्शक
१ कला क्षेत्रातील वळणवाटा – दीपाली दिवेकर, करिअर समुपदेश, आयव्हीजीएस
२ वाणिज्यमधील करिअर व्यवहार – अमिर अन्सारी, करिअर समुपदेशक, आयव्हीजीएस
३ ललित कलांतील ‘संधी’राग’ – जयवंत कुलकर्णी, करिअर समुपदेशक, आयव्हीजीएस
४ विज्ञान शाखेतील करिअर ‘विज्ञान’ – विवेक वेलणकर, करिअर समुपदेशक
विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग दाखविण्यासाठी
दै. ‘लोकसत्ता’ने ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत मुंबईप्रमाणेच ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दहावी, बारावीनंतर कोणते क्षेत्र निवडावे, क्षेत्र निवडल्यानंतर त्याचा अभ्यास कसा करावा, त्या क्षेत्रातील संधी आदींबाबत विद्यार्थ्यांना तज्ज्ञ समुपदेशकांनी उपयुक्त असे मार्गदर्शन केले. त्यातील काही समुपदेशकांच्या प्रतिक्रिया..
कला क्षेत्रात उत्तम संधी
भाषा हे भांडवल विद्यार्थ्यांकडे असेल तर कला क्षेत्रात उत्तमातल्या उत्तम संधी आहेत. भाषा हे समाधान व पैसा मिळवून देणारे माध्यम असून कला शाखेत भारतीय व परदेशी भाषेचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. भाषेचे उत्तम ज्ञान व त्यावर पकड असणे, शब्दांशी खेळायला आवडणे आणि माणसांशी बोलायला आवडणे असे गुण अंगी असतील तर कला शाखेचा पर्याय निवडा. शब्दांच्या जोरावर आपण प्रगती करुन चांगले करिअर घडवू शकतो. यासाठी आपले व्यक्तीमत्त्व आधी ओळखा आणि या शाखेचा विचार करा. मित्रांचा प्रभाव या वयात मुलांवर असतो, परंतू तुम्हाला काय करायचे आहे हेच पक्के ठरवून त्याची निवड करा. कला शाखेतील विविध अभ्यासक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांनी एक नवा पर्याय म्हणून एकदा तरी छोटा किंवा मोठा व्यवसाय केला पाहिजे. त्यामुळे क्षमतेची जाणीव व ओळख होते.
-दीपाली दिवेकर
कष्टाची तयारी असेल तर वाणिज्य निवडा
मेहनत व कष्ट करण्याची तयारी असेल तर वाणिज्य क्षेत्र बिनधास्त निवडा. आकडेमोड, अंकासोबत खेळणे, अर्थविवेचन हे गुण तुमच्यात असतील तर त्याचा वापर या क्षेत्रात काम करण्यासाठी होतो. येथे जनरल कॉमर्स व बायोफोकल कॉमर्स अशा विषयात विविध संधी आहेत. उद्योग क्षेत्रात उत्तम करिअर करायचे असेल तर त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा. तेथे तुम्हाला व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे मार्गदर्शन माहिती सविस्तर दिली जाते. या माहितीचा उद्योग सुरू करण्यासाठी फायदा करून घेता येईल. याशिवाय शासनाचे एक दोन वर्षांचे काही अभ्यासक्रम उपलब्ध असून तुम्हाला त्वरीत शिक्षण पूर्ण करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
-चंद्रकांत मुंडे,
कलेशी मैत्री जगणे शिकवते
पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला फक्त जगवेल, परंतु कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचे हे सांगून जाते. उद्योग व्यवसायाला कलेशी उत्तम साथ मिळाली आणि दिनरात्र कष्ट करण्याची तुमची तयारी असेल तर यश तुमचा पाठलाग सोडणार नाही. ललित कला क्षेत्रात येण्यासाठी काही प्रवेश परिक्षा असून त्या दिल्यावर तुम्हाला महाविद्यालयांत प्रवेश मिळतो. सध्या असलेली प्रचंड स्पर्धा, अपुरे मार्गदर्शन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, मंद आर्थिक विकास, समाजाच्या वाढत्या अपेक्षा, उद्योगातील चढउतार, अनियमीतता ही या क्षेत्रापुढील आव्हाने असून त्यांना तोंड देण्याची क्षमता ठेवा. ललित कला क्षेत्रात येण्याआधी दहावीपूर्वी प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा सराव केला तर त्याचा फायदा होतो. तुम्ही जेवढी मेहनत घ्याल तेवढा पैसा या क्षेत्रात आहे.
-जयवंत कुलकर्णी,
संधीपेक्षा आवड महत्वाची
क्षेत्रातील संधी पाहून विद्यार्थी आपले करिअर निश्चित करतात. मात्र कशाला वाव आहे हे पहाण्यापेक्षा आपल्याला कोणत्या क्षेत्राची आवड आहे हे विद्यार्थ्यांनी पहावे. विज्ञान क्षेत्रात विविध संधी उपलब्ध असल्या तरी त्याला प्रयत्नांची आणि मेहनतीची जोड हवी, त्याशिवाय यश संपादन करता येत नाही. अभियांत्रिकीमध्ये भरपूर अभ्यासक्रम असून त्यांची पूर्ण माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घ्यावी. करिअर निवडीची, अभ्यासक्रम जाणून घेण्याची किंवा कशाचीही माहिती हवी असली की मुले पहिले वेबसाईट शोधतात. परंतू वेबसाईट हे माहिती मिळविण्याचे ठिकाण नाही. त्यापेक्षा प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन चार लोकांशी बोलून माहिती काढा. अभियांत्रिकी करणाऱ्या विद्यार्थ्यांना डिग्री करु कि डिप्लोमा हा प्रश्न असतो त्याचे फायदे तोटे जाणून घेऊन तुम्हाला त्यातही पुढे काय करायचे आहे हे पहा आणि निर्णय घ्या. आपला निर्णय हा आपल्यालाच घ्यायचा असून प्रवेश परिक्षा दिल्याशिवाय पुढील अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत नाही. त्यामुळे स्वतचा अभ्यास आणि पॅ्रक्टीस करण्याची तयारी ठेवून पूर्ण विचार करुनच विज्ञान क्षेत्र निवडा. यासोबतच विज्ञान क्षेत्रातील विविध संधींची माहिती यावेळी विद्यार्थ्यांना वेलणकर यांनी दिली.
-विवेक वेलणकर
‘नीट’च्या दृष्टीकोनातून अकरावीचा अभ्यास करा
नीट परीक्षेच्या अभ्यासक्रमात अकरावीच्या अभ्यासक्रमाचा काही भाग आहे. प्रश्नपत्रिकेत एक तृतीयांश महत्त्व या अभ्यासक्रमाला आहे. विद्यार्थ्यांनी अकरावीचा अभ्यास नीट परीक्षेच्या दृष्टिकोनातून केला तर निश्चितच फायदा होईल. सीईटी परीक्षेत एका प्रश्नासाठी ५४ सेकंद मिळतात. मात्र नीट परीक्षेत एक प्रश्न सोडवण्यासाठी एक मिनिटाचा कालावधी मिळणार आहे. याचा उपयोग विदयार्थ्यांना होईल. केवळ नीट परीक्षेत निगेटीव्ह गुणांकाचा धोका आहे. विद्यार्थ्यांना उत्तर अचूक असल्याची खात्री असेल तरच प्रश्न सोडवावेत. अन्यथा नकारात्मक गुणांकामुळे गुण कमी होण्याची भीती असते. सीईटी आणि नीट परीक्षेच्या अभ्यासक्रमात फारसा बदल नाही. पुढील वर्षांपासून नीट परीक्षा निश्चित होणार आहे.
-प्रा. अनिल देशमुख,