‘लोकसत्ता’तर्फे नवरात्रोत्सवात राबविलेल्या ‘शोध नवदुर्गेचा’ या उपक्रमातील निवडक नवदुर्गाच्या सत्काराचा संगीतमय सोहळा येत्या मंगळवारी नामवंतांच्या उपस्थितीत होणार आहे. प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात संध्याकाळी ६ वाजता होणारा हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.
‘शोध नवदुर्गेचा’ या उपक्रमांतर्गत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या नऊ जणींची निवड करण्यात आली होती. प्रमिलाताई कोकड, शुभांगी बुवा, उषा मडावी, मीनाक्षी देशपांडे, निरुपमा देशपांडे, बेबीताई गायकवाड, डॉ. सुरेखा पाटील, मनाली कुलकर्णी आणि डॉ. अंकिता पाठक या त्या नऊ दुर्गा आहेत. या कर्तृत्ववान दुर्गाचा सत्कार त्या त्या क्षेत्रातल्या कर्तृत्ववान पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे. शास्त्रीय गायिका श्रुती सडोलीकर, उद्योजिका अचला जोशी, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष, दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, राज्याच्या नगरविकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर, सामाजिक कार्यकर्त्यां रेणू गावस्कर, डॉ. कामाक्षी भाटे, डॉ. शुभांगी पारकर आणि अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांच्या हस्ते या नवदुर्गाचा सत्कार करण्यात येणार आहे.
नवदुर्गाच्या या संगीतमय सत्कार सोहळ्यात अमृता काळे, नचिकेत देसाई, अद्वैता लोणकर हे गायक, तर नीला सोहनी, उमा देवराज, मुक्ता रास्ते, प्रेषिता मोरे, विनिता जाधव हे वादक सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाची निर्मिती ‘मिती क्रिएशन्स’ यांची असून, सूत्रसंचालन उत्तरा मोने करणार आहेत. या संगीतमय सत्कार सोहळ्याच्या प्रवेशिका रवींद्र नाटय़ मंदिर येथे उपलब्ध आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा