देशात अलिकडच्या काळात चांगली बातमी ऐकायला येणे हे दुरापास्त झाले असताना, भारतीय अवकाश संशोधकांनी मंगळमोहीम फत्ते केल्याचे वृत्त प्रत्येक भारतीयाच्या मनात आनंद उचळंबवणारे ठरेल. गेल्या नोव्हेंबर महिन्यात पहिल्यांदा आपले अवकाश यान मंगळाच्या दिशेने झेपावले. साधारणत: ६८०० लाख किलोमीटरचे अंतर पार करून मंगळाच्या कक्षेमध्ये उपग्रहाचा प्रवेश करण्याचा टप्पा भारतीय अवकाश संशोधकांनी आज कार्यान्वित केला. आपले हे यश अद्वितीय असेच म्हणावे लागेल. त्यातही आपल्या शास्त्रज्ञांचे कौतुक अधिकच अशासाठी की आपल्या पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहचण्याचा विक्रम आपण केला. जगातील जे अन्य देश मंगळापर्यंत पोहचू शकले, त्यांना अनेक अपयशांना तोंड द्यावे लागले होते. आपल्या यशाचे आणखी थोरपण हे की, अन्य देशांना मंगळावर पोहचण्यासाठी जेवढा खर्च करावा लागला त्याच्या एकदशांश रकमेत आपण हे साध्य केले. आपल्या या मोहिमेसाठी साधारण सात कोटी डॉलर्स म्हणजे जवळपास ४२० कोटी रूपये इतकाच खर्च आला, तर अमेरिकेला मंगळावर पोहचण्यासाठी चार हजार कोटी रूपये खर्चावे लागले. या पार्श्वभूमीवर भारतीय भारतीय अवकाश संशोधकांनी जे करून दाखवले त्यास तोड नाही.
मंगळाच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणे आणि त्याचवेळी ज्या रसायनामुळे पृथ्वीवर जीवसृष्टी तयार झाली त्या मिथेनचे अंश मंगळावरील वातावरणात आहेत किंवा काय याची तपासणी करणे हे या मोहिमेचे उद्दीष्ट आहे. या संशोधनात आपल्याला काय हाती लागेल याचा अंदाज अर्थातच बांधता येणार नाही. परंतु, महत्त्व आहे ते आपण मंगळापर्यंत पोहचू शकलो या घटनेलाच. या यशातील शिरपेचाचा तुरा आणखी कोणता असेल तर तो म्हणजे या मोहिमेचे झालेले भारतीयकरण. म्हणजे या मोहिमेत वापरण्यात आलेली उपकरणे व तंत्रज्ञान आणि विशेषत: प्रक्षेपक हे भारतीय बनावटीचे असून त्याच्या विकासात आपल्याला मिळालेले यश देखिल तितकेच लक्षणीय म्हणावे लागेल.
भारतीय मानसिकतेत मंगळ आणि शनी या ग्रहांभोवती एकप्रकारचे गूढ आहे. एखाद्याला मंगळ असणे वा शनीची बाधा होणे ही कल्पना भारतीय मानसिकतेत भीतीदायक मानली जाते. अंधश्रध्देच्या या अमंगळ भीतीत भारतीय अवकाश संशोधकांच्या आजच्या यशाने कायमची मूठमाती दिली आहे, असे म्हणता येईल. तेव्हा आपल्या या मंगळगानात आपण सर्वांना सहभागी व्हावे असा हा क्षण आहे. सर्व भारतीय शास्त्रज्ञांचे ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे त्रिवार अभिनंदन.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta newspaper congratulates isro for successful launch of its mars mission