वयाच्या सोळाव्या वर्षीच क्रिकेटजगतात ‘लिटिल वंडर’ ठरलेल्या भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या अनेक आठवणी त्याच्या असंख्य चाहत्यांनी जपून ठेवल्या आहेत. मात्र, अवघ्या चार महिन्यांचा सचिन कॅमेऱ्यात बंदिस्त करून ठेवण्याची दुर्मीळ आठवण जपली ती कळव्यातील सुधाकर फडके यांनी. गेली कित्येक वर्षे त्यांनी हा अमूल्य ठेवा जपून ठेवला होता. त्यांच्याकडील या अमूल्य ठेव्याचे मात्र सोमवारी खऱ्या अर्थाने चीज झाले. दस्तुरखुद्द सचिननेच ही दुर्मीळ छायाचित्रे स्वत: कौतुकाने न्याहाळली. या छायाचित्रांवर स्वाक्षरी करताना सचिनच्या चेहऱ्यावरही हरवलेले बालपण गवसल्याचे समाधान विलसत होते.
तोंडात बोट घालून आईकडे कौतुकाने पाहणाऱ्या अवघ्या चार महिन्यांच्या सचिनच्या दुर्मीळ छायाचित्रांसंदर्भातील वृत्त ‘लोकसत्ता’ ने १५ नोव्हेंबरच्या अंकात ‘ठाणेकर फडक्यांनी जपल्या डोंबिवलीकर सचिनच्या स्मृती’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध केले होते. त्यानंतर ‘लोकप्रभा’मधील ‘बाल सचिन’ या लेखातही अन्य छायाचित्रे होती. प्रा. रमेश तेंडुलकरांनी त्यावेळी फडकेंना आवर्जून डोंबिवलीत बोलावून लहानग्या सचिनची छायाचित्रे काढून घेतली होती. सचिनच्या एका परिचिताने हा अंक सचिनला दाखवला तेव्हा वडिलांचे स्नेही असलेल्या सुधाकर फडके यांना भेटण्याची इच्छा त्याने व्यक्त केली.
अतुल रानडे यांनी सुधाकर फडके यांना तसा निरोप दिला आणि त्यानंतर सोमवारी हा योग जुळून आला. वांद्रे-कुर्ला एमसीए क्लबमध्ये फडके कुटुंबाची सचिनशी भेट झाली. काही मिनिटांच्या या भेटीत सचिनने फडके कुटुंबाशी गप्पा मारल्या व बालपणीच्या आठवणीही ताज्या केल्या. त्यानंतर फडकेंनी ही सर्व छायाचित्रे सचिनला भेट दिली. त्या दुर्मीळ छायाचित्रांवर सचिनने कौतुकाने स्वाक्षऱ्या केल्या, तेव्हा एक वर्तुळ पूर्ण झाल्याचे समाधान सुधाकर फडकेंच्या चेहऱ्यावर दिसत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा