‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाचे सहावे पर्व
पाऊससरींच्या सावनी खेळाने तृप्त झालेली धरणी, डोळ्यांना निववणारी हिरवाई यात दुष्काळझळांच्या रूक्ष आठवणींचे पडसादही दडून गेले आहेत. वातावरणात उबदार दिलासा भरून राहिलेला आहे. हा काळ विघ्नहर्त्यां गजाननाच्या आगमनाचा. किंबहुना त्याच्या आगमनाच्या उत्कंठेमुळे अन् स्वागताच्या लगबगीमुळेच मनांना उभारी आलेली आहे. चिंता असतातच. रस्त्यावरील खड्डय़ांपासून रस्ते अडविणाऱ्या मंडपांपर्यंत अनेक सामाजिक व्याधी आहेतच. साधे सणाला गावी जाताना रस्त्यावर एखादा पूल दिसताच काळजाचा ठोका चुकतो आहे.. पण ते सारे विसरत, सहन करीत आपल्या आराध्य दैवताच्या स्वागतासाठी अवघा महाराष्ट्र आतुर झाला आहे.. आणि याच सकारात्मक वातावरणात पुन्हा एकदा महाराष्ट्रातील एका अनोख्या दानयज्ञाला सुरुवात होत आहे. ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या सहाव्या पर्वास गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर प्रारंभ होत आहे.
या उपक्रमाच्या गेल्या पाच वर्षांत उभ्या महाराष्ट्राने, मराठीजनांनी तब्बल पन्नास संस्थांना मदतीचा हात दिला. विधायक कार्याचा वसा घेऊन उभ्या राहिलेल्या या संस्था.. कोणी ज्ञानवृद्धीसाठी कटिबद्ध असलेल्या, तर कोणी समाजाने ठोकरलेल्या अपंगांना, परित्यक्तांना, रुग्णांना, वयोवृद्धांना आधार देणाऱ्या, कोणी ग्रंथांना जिवापरी जपत समाजाचे बुद्धीवैभव वाढविण्यासाठी झटणाऱ्या तर कोणी समाजातील कलासंस्कृती जोपासणाऱ्या.. विविध क्षेत्रांत काम करताना आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या या संस्था. त्या जगविणे, जोपासणे हे सर्वाचेच काम हे जाणून ‘लोकसत्ता’ दर वर्षी बुद्धिदात्या देवतेच्या या उत्सव काळात दहा संस्थांची ओळख वाचकांना करून देत असते. त्यात ‘लोकसत्ता’चा संबंध केवळ एक माध्यम म्हणून, असे या उपक्रमाचे स्वरूप.
यंदाही ‘लोकसत्ता’मधून अशा दहा संस्थांची माहिती देण्यात येणार आहे. ‘लोकसत्ता’च्या लाखो वाचकांची सत्कर्मी रती वाढो हीच सदिच्छा असते. सर्वकार्येषु सर्वदाच्या निमित्ताने यंदाही ती संधी लाभणार आहे. समाजाला आधारभूत ठरणाऱ्या या संस्था, पण त्यांनाही समाजाकडून आधाराची गरज असते. दरवर्षीप्रमाणेच यंदाही असे लाखो आधारहात पुढे येतील, यात शंका नाही.
- उद्यापासून दररोज एका संस्थेच्या कार्याची माहिती, पत्ता, दूरध्वनी क्रमांक व देणगी देण्यासाठी आवश्यक असलेला अन्य तपशील ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध करण्यात येईल. बुद्धिदात्या गजाननाच्या महोत्सव काळात हा एक आगळा दानयज्ञ सुरू राहील.
- गणेशोत्सवानिमित्त सर्वाना मन:पूर्वक शुभेच्छा!