डोंबिवली येथील सावळाराम महाराज क्रीडा संकुलामध्ये आगरी युथ फोरम आयोजित ११ व्या अखिल भारतीय आगरी महोत्सवाचे बुधवारी सायंकाळी उद्घाटन झाले असून हा महोत्सव आठ दिवस सुरू राहणार आहे. आगरी समाज संस्कृतीचे जतन तसेच संवर्धन करणे, असा या महोत्सवामागचा उद्देश आहे. या महोत्सवास ‘लोकसत्ता’ माध्यम प्रायोजक आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन आगरी समाजाचे ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी खासदार आनंद परांजपे, शाम म्हात्रे, हरिश्चंद्र पाटील, संतोष केणे, रवी पाटील, सुवर्णा केणे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्योगमंत्री नारायण राणे काही कारणास्तव उपस्थित नव्हते. या महोत्सवामध्ये रामशेठ ठाकूर यांनी आगरी समाजाला मार्गदर्शन केले. विकासाची फळे पदरात पाडून घ्यायची असतील तर आता हिंसेला विसरा, असा मौलिक सल्लाही ठाकूर यांनी दिला. मनोरंजनातून ज्ञान संपादन करण्याचे आता दिवस आहेत.
माहिती-तंत्रज्ञान तसेच विज्ञानामुळे जग जवळ येऊ लागले आहे. या विकासाच्या प्रवाहात आगरी समाजाने आगेकूच केली पाहिजे. विकासाची फळे पदरात पाडून घ्यायची असतील तर यापुढे विळे, कोयत्यांची गरज नाही. बहुसंख्याकांना विश्वासात घ्या, एकमत तयार करा आणि विकासाच्या मार्गावर चला, यापूर्वीसारख्या रक्तरंजित क्रांती करून काहीही उपयोग नाही, असे ठाकूर यांनी सांगितले. शासनाकडून आगरी समाजासाठी महाविद्यालयासाठी जागा मिळणे शक्य नाही. शेतकरी जागृती मंडळाची डोंबिवलीजवळ पाच एकर जागा असून तिचा सदुपयोग करू, असे आमदार रमेश पाटील यांनी सांगितले.
एमआयडीसीच्या माध्यमातून ग्रामपंचायत हद्दीत विकासकामे करण्यासाठी वीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. एमआयडीसीत आगरी भवन उभारण्यासाठी आपण सहकार्य करू, असे खासदार परांजपे यांनी सांगितले.

Story img Loader