मुंबई : प्रख्यात शास्त्रीय संगीत गायक दिवंगत जितेंद्र अभिषेकी, सुरेश हळदणकर आणि सी. आर. व्यास यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यंदाही ‘लोकसत्ता स्वरांजली २०२५’ या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्वरप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन केले जाते. ३ आणि ४ जानेवारी २०२५ दरम्यान रंगणाऱ्या ‘लोकसत्ता स्वरांजली २०२५’ या संगीत महोत्सवात भारतीय शास्त्रीय संगीतातील मातब्बर कलावंत सहभागी होतील.
यंदा ३ आणि ४ जानेवारी २०२५ दरम्यान सायंकाळी ७ वाजता वरळी येथील नेहरू सेंटर ऑडिटोरियममध्ये ‘लोकसत्ता स्वरांजली २०२५’ पार पडणार आहे. शुक्रवारी, ३ जानेवारी २०२५ रोजी महोत्सवाची सुरुवात सितारवादक पंडित पुर्बयान चॅटर्जी आणि प्रख्यात बासरीवादक पंडित रोणू मजुमदार यांच्या जुगलबंदीने होईल. तारा आणि वायू यांचा एक अतुल्य असा सौहार्दपूर्ण संगम या जुगलबंदीतून अनुभवता येईल. त्यानंतर आघाडीच्या शास्त्रीय संगीत गायिका शुभा मुद्गल गायन सादर करतील. दमदार आवाज आणि संगीताची अतुल्य अशी जाण यांसाठी मुदगल ओळखल्या जातात.
हेही वाचा >>> नववर्षाच्या स्वागतासाठी बेस्टच्या विशेष बस
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात शनिवारी, ४ जानेवारी २०२५ रोजी प्रख्यात शास्त्रीय संगीत गायक दिवंगत पंडित कुमार गंधर्व यांच्या कन्या कलापिनी कोमकली यांच्या शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम होईल. या दोन दिवसीय महोत्सवाची सांगता ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक पंडित अजय चक्रवर्ती यांच्या गायनाने होईल. कलापिनी यांचे सुमधूर आवाजातील गायन आणि पंडित अजय चक्रवर्ती यांचे खर्जाच्या आवाजातील गायन अशी वैविध्यपूर्ण संगीतपर्वणी रसिकांना मिळेल. त्यांना तबलावादक आदित्य कल्याणपूर साथसंगत करतील.
हेही वाचा >>> अवघ्या १० रुपयात आरोग्य तपासणी व उपचार! अडीच लाख रुग्णांची वर्षाकाठी तपासणी…
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत लोकांमध्ये आणि खास करून युवकांमध्ये रुजावे या उद्देशाने ‘लोकसत्ता स्वरांजली महोत्सवा’चे आयोजन करण्यात येते. ‘गेली कित्येक वर्षे स्वरांजलीच्या माध्यमातून मी माझ्या गुरूंना आदरांजली अर्पण करत असून तो माझ्यासाठी एक प्रगल्भ करणारा अनुभव आहे. दरवर्षी या महोत्सवात नामवंत कलाकारांबरोबरच विविध क्षेत्रातील रसिक उपस्थित राहतात. या महोत्सवाच्या माध्यमातून शास्त्रीय संगीताचा प्रसार करण्याची एक नामी संधी मिळते असेही माझे मानणे आहे’, असे स्वरप्रभा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष पंडित प्रभाकर कारेकर यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिका www.bookmyshow.com वर उपलब्ध आहेत.
लोकसत्ता स्वरांजली २०२५
कुठे : नेहरू सेंटर ऑडिटोरियम, वरळी.
कधी : ३ आणि ४ जानेवारी
वेळ : सायंकाळी ७ वाजता