मुंबई : विविध क्षेत्रांतील युवा पिढीचे कार्य काळाला नवी झळाळी देणारे आणि समाजाला दिशा देणारे ठरते. निरनिराळ्या क्षेत्रांतील तरुणांच्या कार्याचा यथोचित सन्मान करणारा आणि कौतुकाची थाप देणारा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार सोहळा सोमवार, ३१ मार्च रोजी होणार आहे. यंदा या पुरस्कार सोहळ्याला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितीत राहणार असून प्रज्ञावंत २० तरुण तेजांकितांचा गौरव करण्यात येणार आहे.

युवा गुणीजणांना कौतुकाची थाप देणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार सोहळ्याचे यंदा सातवे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि राज्याबाहेरूनही आलेल्या शेकडो तरुण प्रज्ञावंतांच्या अर्जांची परीक्षक मंडळातर्फे काटेकोरपणे छाननी करण्यात आली. प्रत्येक अर्जदाराच्या कामाचे स्वरूप, त्याचा परिणाम, विश्वासार्हता, व्याप्ती असे अनेक तपशील परीक्षकांनी जाणून घेतले. त्याचबरोबर अर्जदारांनी दिलेल्या माहितीची कागदपत्रांच्या आधारेही पडताळणी करण्यात आली. आजवर देशभरातील १०० हून अधिक प्रज्ञावंत तरुण मंडळींना ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यंदा विविध क्षेत्रांतील अधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा मुंबईत रंगणार असून सदर सोहळा फक्त निमंत्रितांसाठीच आहे.

हजरत अमीर खुसरो प्रोजेक्ट’

‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार सोहळ्याला दरवर्षी रूढ प्रचलित कार्यक्रमांना छेद देणाऱ्या नावीन्यपूर्ण मनोरंजनात्मक कार्यक्रमांची साथ लाभते. या अनुषंगाने यंदा या सोहळ्यात शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताची मेजवानी अनुभवता येणार आहे. बंदिश, तराणा, सूफी कलाम, लोकगीते आणि ठुमरी यांसारख्या शास्त्रीय आणि उपशास्त्रीय प्रकारांचा समावेश असलेल्या ‘हजरत अमीर खुसरो प्रोजेक्ट’ या सांगीतिक मैफिलीचे आयोजन केले असून हजरत अमीर खुसरो यांच्या प्राचीन आणि दुर्मीळ रचना सादर होणार आहेत. संगीतकार अभिजीत पोहनकर प्रस्तुत ‘हजरत अमीर खुसरो प्रोजेक्ट’ हा कार्यक्रम श्रोत्यांना १३ व्या शतकातील उत्तर भारतीय संगीतात मग्न करतो.

‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा यंदा प्रसिद्ध अभिनेता अभिजीत खांडकेकर सांभाळणार आहे. मालिका – चित्रपटांतून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारा अभिजीत ओघवत्या शैलीत या सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार आहे.

प्रायोजक

● मुख्य प्रायोजक : महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळ

● सहप्रायोजक : सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स, केसरी टूर्स, न्याती ग्रुप, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यटन संचालनालय (पर्यटन विभाग) महाराष्ट्र शासन, वैभवलक्ष्मी डेव्हलपर्स, महानिर्मिती, रिजन्सी ग्रुप

● सहाय्य : महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड

● पॉवर्ड बाय : लक्ष्य अकॅडमी, पवित्रविवाह मॅट्रिमोनी

● नॉलेज पार्टनर : प्राइस वॉटर हाउस कूपर्स

अभिजीत खांडकेकर निवेदकाच्या भूमिकेत