‘तरुण तेजांकित’साठी नावनोंदणीला भरभरून प्रतिसाद
विविध क्षेत्रांतील तरुणाईच्या सर्जनशीलतेला, जिद्दीला दाद देणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमाचे दुसरे पर्व सुरू झाले आहे. उपक्रमात नोंदणीला भरभरून प्रतिसाद मिळत असून, सहभागी होण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी आवश्यक आहे.
साहित्य, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक कार्य, प्रशासन अशा अनेक क्षेत्रांत तरुण मोठय़ा जिद्दीने पाय रोवून उभे आहेत. विचारांना कृतीची जोड देत परिस्थिती बदलू पाहात आहेत. नवे मानदंड निर्माण करत आहेत. त्यांच्या परिश्रमाचे, प्रज्ञेचे कौतुक ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ या उपक्रमातून करण्यात येते.
गेल्या वर्षी या उपक्रमांतर्गत १२ तरुण प्रज्ञावंतांचा गौरव करण्यात आला. कला, क्रीडा, आरोग्य, समाजसेवा, संशोधन अशा विविध क्षेत्रांतील युवारत्नांच्या कर्तृत्वाला मिळालेली ती पावती होती. यंदा उपक्रमाच्या दुसऱ्या पर्वातही राज्यभरातून भरभरून प्रतिसाद लाभत आहे.
३१ जानेवारीपर्यंत नोंदणी करा
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी तरुणांनी http://taruntejankit.loksatta.com/methodology/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्जात माहिती भरून गुरुवार, ३१ जानेवारीपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इतरांनाही आपल्या भवताली दिसणाऱ्या गुणवंत तरुणांची नावे माहितीसह सुचवता येतील. राज्यभरातून आलेल्या अर्जातून नामवंतांची समिती ‘तरुण तेजांकित’साठी तरुणांची निवड करणार आहे. यासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या विभागीय समित्या नेमण्यात आल्या आहेत.
विभागनिहाय समित्या
- पुणे : श्रीरंग इनामदार (क्रीडा), योगेश शौचे (संशोधन), प्रसाद वनारसे (कला), अरविंद पाटकर, विनोद शिरसाठ (सामाजिक/साहित्य)
- नागपूर : सुखदेव थोरात (सामाजिक), डॉ. प्रमोद पडोळे (संशोधन), अॅड्. स्मिता सिंगलकर (कला), नितीन लोणकर (नवउद्यमी), डॉ. शरद सूर्यवंशी (क्रीडा)
- नाशिक : अपूर्वा जाखडी (विज्ञान/ संशोधन), मकरंद हिंगणे (संगीत), अभय कुलकर्णी (नवउद्यमी), आनंद खरे (क्रीडा), डॉ. वृंदा भार्गवे (कला/साहित्य), मेधा सायखेडकर (विधि), संदीप डोळस (समाजकारण)
- औरंगाबाद : मुकुंद कुलकर्णी (उद्योग), विश्वनाथ ओक (संगीत), बी. बी. ठोंबरे, सु. भि. वराडे (कृषी)
- कोल्हापूर : दिलीप बापट (कला), अनंत माने (उद्योग), प्रा. डॉ. मधुकर बाचुळकर (विज्ञान)
- रत्नागिरी : डॉ. पराग हळदणकर (संशोधन), डॉ. केशव सुखटणकर (शिक्षण/संशोधन), नितीन कानविंदे (कला), उदय लोध (व्यापार/ पर्यटन), मिलिंद दीक्षित (क्रीडा)
सहप्रायोजक..
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ या उपक्रमाचे सारस्वत बँक सहप्रायोजक असून एम. के. घारे ज्वेलर्स ‘पॉवर्ड बाय’ पार्टनर आहेत.