मुंबई : उज्ज्वल भविष्याची पहाट अनुभवायची या जिद्दीने अनेक युवा सर्जनशील मने आपापल्या क्षेत्रात अक्षरश: तहानभूक हरपून काम करत असतात. अथक परिश्रमातून आणि कार्यजिद्दीच्या तेजातून भविष्याच्या वाटा प्रकाशमान करणाऱ्या २० ‘तरुण तेजांकितां’चा सन्मान सोहळा सोमवारी परळ येथील आयटीसी ग्रँड सेंट्रल हॉटेलमध्ये रंगला. प्रसिद्ध संगीतकार अभिजीत पोहनकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला, १३ व्या शतकातील रचनाकार अमीर खुस्राो यांच्या दुर्मीळ शास्त्रीय संगीत रचनांवर आधारित संगीत कार्यक्रमाने या पुरस्कार सोहळ्याची रंगत अधिक वाढवली. गेली सात वर्षे ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या मान्यवरांच्या आणि विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.

‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांचे यंदाचे सातवे पर्व होते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सामाजिक, प्रशासकीय, नवउद्यामी, कायदा, कला-मनोरंजन अशा विविध क्षेत्रात दूरदृष्टीने आणि समाजाला प्रेरणादायी ठरेल असे कार्य करणाऱ्या २० युवा गुणीजनांना ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

भविष्यालाही अभिमान वाटेल अशा वर्तमानाचा गौरव करणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ या पुरस्कारामागचा उद्देश स्पष्ट करताना ‘उद्या जे लोकांना माहिती होणार आहेत, त्यांना आज समाजासमोर आणण्याचे काम या पुरस्कारांच्या माध्यमातून होत आहे’, असे ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी प्रास्ताविकात सांगितले. ‘कवी केशवसुतांच्या ‘आम्ही कोण म्हणूनि काय पुसता?’ या कवितेतील ‘फोले पाखडिता तुम्ही, निवडतो ते सत्त्व आम्ही निके’ या वाक्याचा दाखला देत महाराष्ट्राला संपन्न करू शकतील, अशा उद्याच्या सत्त्वशील, कर्तबगार तरुणांचा हा सत्कार सोहळा आहे, असे कुबेर यांनी स्पष्ट केले. स्वत:च्या कर्तृत्वावर यशाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या युवांचा सत्कार या पुरस्कारांनी केला जातो. अशा युवांना पुरस्कार देण्यासाठी स्वत: पहिल्या पिढीचे राजकारणी असलेले केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती लाभणे हा सुरेख योगायोग जुळून आल्याबद्दल कुबेर यांनी आनंद व्यक्त केला.

गडकरी यांच्यासह ‘सारस्वत को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड’चे गौतम ठाकूर, ‘केसरी टूर्स’चे शैलेश पाटील, ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’चे अविनाश ढाकणे, ‘न्याती ग्रुप’चे हरीश श्रॉफ, ‘वैभवलक्ष्मी डेव्हलपर्स’चे डॉ रामदास सांगळे, ‘लक्ष्य अकॅडमी’चे अजित पडवळ, ‘पवित्र विवाह मॅट्रिमोनी’चे ऋषिकेश कदम, आयआयटीचे डॉ. मिलिंद राणे, अभिनेता संजय नार्वेकर, वैभव मांगले, गिरीश कुलकर्णी, जितेंद्र जोशी, राजन भिसे यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

खुमासदार निवेदन

प्रसिद्ध अभिनेता अभिजीत खांडकेकर याच्या खुमासदार आणि ओघवत्या शैलीतील सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. या सोहळ्यात पुरस्कारांदरम्यान प्रत्येक गुणवंतांच्या कामगिरीची ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली. या ध्वनिचित्रफितीची निर्मिती ‘रेजॉइस’चे वैभव बाबाजी यांनी केली होती. प्रसिद्ध अभिनेते उदय सबनीस यांच्या आवाजातील ध्वनिचित्रफितीद्वारे गुणवंतांच्या कामगिरीची माहिती उपस्थितांना देण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमाची संहिता चिन्मय पाटणकर यांनी लिहिली होती.