मुंबई : वर्तमानाकडून भविष्याला नेहमीच दिशा प्राप्त होत असते, हेच जाणून भविष्य घडविणाऱ्या वर्तमानाचा गौरव ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार देऊन करण्यात येतो. विविध क्षेत्रांमध्ये लखलखते यश संपादन करणाऱ्या आणि समाजोपयोगी कामांमध्ये झोकून देत अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या २० तरुण तेजांकितांचा सन्मान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोमवार, ३१ मार्च रोजी केला जाईल.

विविध अडचणींवर मात करीत यश संपादन करणाऱ्या युवांचा संघर्ष, यश, कर्तृत्व सारेच प्रेरणादायी असते. त्यामुळे त्यांचे कर्तृत्व समाजासमोर आणण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराचा उपक्रम यशस्वीपणे राबविला जात आहे. ऊर्जा, उद्यामशीलता, जिद्द आणि प्रज्ञेला गौरविणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार सोहळ्याचे यंदा सातवे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि राज्याबाहेरूनही या पुरस्कारासाठी शेकडो उमेदवारांनी अर्ज केले होते.

या अर्जांची परीक्षक समितीने काटेकोरपणे छाननी केली. कला व मनोरंजन, उद्याोग, व्यवसाय, समाजसेवा,कायदा व प्रशासन, विज्ञान व संशोधन, क्रीडा अशा विभागांमध्ये तेजांकितांचा शोध घेण्यात आला. ‘लोकसत्ता तरुण तेजांकित २०२४’च्या परीक्षक समितीत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, उद्याोग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन, ज्येष्ठ दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते कौस्तुभ आमटे यांचा समावेश होता. विविध क्षेत्रांतील २० तरुण गुणवंतांचा गौरव मुंबईत होणाऱ्या सोहळ्यात करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम निमंत्रितांसाठीच आहे.

हजरत अमीर खुसरो प्रोजेक्टची पर्वणी

‘लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार’ सोहळ्यात यंदाही नावीन्यपूर्ण मनोरंजनात्मक कार्यक्रमाची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. संगीतकार अभिजीत पोहनकर प्रस्तुत ‘हजरत अमीर खुसरो प्रोजेक्ट’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात हजरत अमीर खुसरो यांच्या प्राचीन आणि दुर्मीळ रचना सादर होणार आहेत.

अभिजित खांडकेकर निवेदकाच्या भूमिकेत

तरुणाईच्या जिद्दीचा आणि प्रज्ञेचा गौरव करणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन यंदा प्रसिद्ध अभिनेता अभिजित खांडकेकर करणार आहेत. मालिका-चित्रपटांतून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारा अभिजित त्याच्या ओघवत्या शैलीत या सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार आहे.