‘लोकसत्ता’च्या स्पर्धेचे बिगुल वाजले
तरुणाईच्या विचारधारेला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘लोकसत्ता वक्ता दशसहस्त्रेषु’ या वक्तृत्व स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचे बिगूल वाजले आहे. पुन्हा एकदा राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध विषयांवर आपली थेट मते, विचार मांडण्याची संधी देणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेची सुरुवात या महिनाअखेरीस होणार आहे. राज्यभरातील तरुणाईला आपल्याशा वाटणाऱ्या, त्यांच्या वक्तृत्वगुणांना आव्हान देणाऱ्या या स्पर्धेचे विषय, प्राथमिक फेरी याबाबतचे तपशील लवकरच आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. त्याआधीच या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शिलेदारांनो, सज्ज व्हा.
‘लोकसत्ता’ आयोजित, ‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय ‘बँक ऑफ महाराष्ट्र’, ‘विश्वेश्वर को ऑपरेटिव्ह बँक’ आणि ‘इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट’ (आयसीडी) ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेला लवकरच सुरुवात होणार आहे. ठाणे, मुंबई, नाशिक, पुणे, नगर, रत्नागिरी, नागपूर आणि औरंगाबाद अशा आठ विभागांमधून ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. पहिल्याच पर्वात महाविद्यालयीन तरुणांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या ‘वक्ता दशसहस्र्ोषु’चे दुसरे पर्वही जोरदारपणे रंगले होते. त्यामुळे स्पर्धेचे हे तिसरे पर्व पहिल्या दोन पर्वाहून अधिक आव्हानात्मक असेल, यात शंका नाही.
स्पर्धा कशी?
दरवर्षीप्रमाणे याही वेळी आठ केंद्रांवर प्राथमिक फेरी होईल. प्राथमिक फेरीनंतर विभागीय अंतिम फेरी घेतली जाईल आणि त्यात विजेते ठरलेले स्पर्धक महाअंतिम फेरीत दाखल होतील. अनेक कसोटय़ांमधून पार पडत या स्पर्धेतील ‘वक्ता दशसहस्र्ोषु’चा मान एका स्पर्धकाला मिळणार आहे.