इयत्ता अकरावीपासून ते पदवीव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत असलेल्या स्पर्धकांनी तयारीनिशी सहभाग घेतल्याने ‘लोकसत्ता’ प्रस्तुत ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेची मुंबई विभागाची प्राथमिक फेरी रविवारी चांगलीच रंगली.
राज्यभरातल्या महाविद्यालयीन वक्त्यांना भुरळ घालणारी व त्यांच्या वक्तृत्वाचा कस पाहणारी ही स्पर्धा सकाळी ११च्या सुमारास नरिमन पॉइंट येथील एक्स्प्रेस टॉवरमधील सभागृहात सुरू झाली.
दुपारी साडेतीन वाजेपर्यंत रंगलेल्या या स्पर्धेमध्ये विचारांची सुस्पष्ट व वेधक मांडणी, उच्चार-हातवारे यांच्यातील लय, अभ्यासपूर्ण विवेचन अशा गुणांनी फुललेल्या आपल्या वक्तृत्व शैलीचा आविष्कार पाहता आला.
मुंबईमधील विविध महाविद्यालयांतील तरुण-तरुणींनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेसाठी ‘धर्म आणि दहशतवाद’, ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते?’ , ‘बिइंग ‘सेल्फी’श’, ‘इतिहास वर्तमानातला’, ‘मला कळलेली नमोनिती’ हे विषय देण्यात आले होते.धर्माला दहशतवादाशी जोडण्याचे काम काही हिंसक शक्ती करत आहेत.
परंतु, धर्माला शांतता आणि प्रेमाशी जोडले पाहिजे..वर्तमानातील समस्यांना सोडवण्यासाठी आधी इतिहास समजून घ्यायला हवा..एका बाजूला स्त्रीला देवी म्हणून पूजायचे आणि दुसरीकडे त्यांना मंदिरात प्रवेश करू द्यायचा नाही.. सेल्फीच्या नादात आपण स्वत:मध्ये इतके हरवले आहोत की तो तो क्षण विशेष करण्याच्या मोहात खरे जगणेच विसरलो आहोत..असे मुद्दे मांडत धर्म, दहशतवाद, इतिहास, स्त्री प्रश्न, सेल्फी आदी विषयांबाबत महाविद्यालयीन वक्त्यांनी आपले विचार व्यक्त केले.
रुपारेल महाविद्यालयाच्या प्रा. अनघा मांडवकर व सोमय्या महाविद्यालयाचे प्रा. प्रसाद भिडे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
प्राथमिक फेरीतून उत्कृष्ट आठ वक्त्यांची मुंबईच्या विभागीय अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. उत्तमोत्तम वक्त्यांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रातील आजच्या पिढीलाही आपले विचार मांडायचे
असतात.
अशा तरुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘लोकसत्ता’ या स्पर्धेचे आयोजन करते. हे या स्पर्धेचे दुसरे वर्ष असून ‘जनता सहकारी बँक’ आणि ‘तन्वी हर्बल प्रोडक्ट्स’ हे स्पर्धेचे प्रायोजक आहेत.
‘सिंहगड इन्स्टिटय़ूट’ , ‘मांडके हिअरिंग सव्र्हिसेस’, ‘इंडियन ऑइल’, ‘इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट’ यांच्या स्पर्धेस सहकार्य लाभले असून ‘युनिक अकॅडमी’ व ‘स्टडी सर्कल’ या स्पर्धेचे नॉलेज पार्टनर आहेत.
मुंबई विभागातून अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकांच्या प्रतिक्रिया
विषय भावला
या स्पर्धेचे आयोजन अगदी नेटके होते. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते?’ या विषयामुळे महिलांच्या विविध समस्यांवर बोलण्याची संधी मिळाली. मित्रमैत्रिणींमध्ये महिलांच्या प्रश्नावर अनेक वेळा चर्चा होते. त्यावेळी अनेक मुद्दय़ांवर बोलू शकत नसल्याने अभिव्यक्त व्हायला मर्यादा येतात. मात्र या स्पर्धेमुळे मी या विषयावर ठामपणे बोलू शकले. तसेच परीक्षकांनीही याबाबत मार्गदर्शन केल्याने आत्मविश्वास वाढला.
– प्रिया तरडे, डी.जी. रुपारेल महाविद्यालय, माहीम.
इतरांच्या सादरीकरणातून शिकता आले
या स्पर्धेमुळे एका मोठय़ा व्यासपीठावर विचार मांडण्याची संधी मिळाली. याचसोबत इतरांनी केलेल्या सादरीकरणातूनही बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. मी स्वत: एक मुलगी असल्यामुळे स्त्री प्रश्नांसदर्भात आजूबाजूला घडत असलेल्या घटनांबाबत व्यक्त होण्याची आवश्यकता मला वाटत होती. या स्पर्धेमुळे स्त्री प्रश्नांविषयी माझी मते मला सर्वासमोर मांडता आली. यावेळी परिक्षकांचेही मोलाचे मार्गदर्शन आम्हाला मिळाले.
– सुप्रिया ठाकूर, नालंदा महाविद्यालय, बोरिवली
पुढील फेरीची उत्सुकता
महाराष्ट्रभरातून या स्पर्धेसाठी खूप विद्यार्थी प्रयत्न करत असतात. अशा स्पर्धेत भाग घेण्याची संधी मला मिळाल्याने आनंद वाटतो. स्पर्धा खूप रंगली होती. सर्व स्पर्धकांच्या उत्तम सादरीकरणामुळे चुरस निर्माण झाली होती. स्पर्धेमुळे स्वत:च्या विकासाला संधी मिळाली असून पुढील फेरीसाठी उत्सुकता व धाकधूक दोन्ही वाढली आहे.
– आदित्य जंगले, रामनारायण रुईया महाविद्यालय, माटुंगा
परीक्षकांच्या प्रतिक्रिया
विषयाच्या आशयाला महत्त्व द्या
‘लोकसत्ता’ची ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ स्पर्धा ही महाविद्यालयीन वक्त्यांसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांनी नवनवीन विषयांचा धांडोळा घेतला पाहिजे. पुष्कळ वाचनासह स्वत:ला सतत अद्ययावत कसे ठेवता येईल याचा विचार करायला हवा. अशा स्पर्धासाठी विद्यार्थ्यांनी आपण निवडलेल्या विषयामागची भूमिका काय आहे हे जाणून घ्यायला हवे. इतरांना आवडण्यापेक्षा आपले सादरीकरण स्वत:ला भावले पाहिजे. वक्तृत्व स्पर्धामध्ये सहभागी होणारे स्पर्धक भाषण सादरीकरणाकरिता काही क्लुप्त्या वापरतात. त्यासाठी ते निरनिराळ्या तंत्राचा आधार घेतात. परंतु तंत्रापेक्षा आशयाला महत्त्व द्यायला हवे. आपले विचार दुसऱ्यांना पटतील अशा रितीने मांडण्यासाठी अधिक प्रभावीपणे सादरीकरण कसे करता येईल याकडे लक्ष द्यायला हवे.
डॉ. प्रसाद भिडे, परीक्षक
वयाला साजेसा विषय
इतर स्पर्धामध्ये स्पर्धा सुरु होण्याची वेळ ही मुलांचा विचार न करता दिली जाते. विनाकारण तासन्तास ताटकळत उभे राहावे लागते. मात्र या स्पर्धेत कोणताही वेळ वाया न गेल्याने उत्साहाने सहभागी होता आले. स्पर्धेसाठी देण्यात आलेले विषय माझ्या वयाला साजेसे असल्याने तयारी करण्यासाठी अडचण आली नाही. ‘बिईंग ‘सेल्फी’श’ या विषयावर बोलताना अभ्यासाबरोबरच आपण आजूबाजूला पाहत असलेल्या घटनांचे निरीक्षण करुन विषय मांडता आला.
तुषार जोशी, म. ल. डहाणूकर महाविद्यालय, विलेपार्ले
वक्ते निर्माण करण्याची ‘फॅक्टरी’
वक्त्यांनी आपल्या विषयांची मांडणी कशी करायला हवी, सादरीकरणातून आपले बोलणे अधिक प्रभावीपणे कसा मांडता येते हे इथे शिकायला मिळाले. विषयाच्या तयारीसाठी अधिक मेहनत घेतली होती. इतर स्पर्धकांना ऐकल्यानंतर व परिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे स्वत:त आणखी सुधारणा करण्याचे मी ठरवले आहे. ही स्पर्धा म्हणजे वक्ते निर्माण करण्याची फॅक्टरीच असल्याचे मला वाटते.
– प्रणव कांड, किर्ती महाविद्यालय, दादर
स्पर्धकांचा कस पाहणारी स्पर्धा
मी गेल्या वर्षीही ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ स्पर्धेत सहभागी झालो होतो. या स्पर्धेत विषय मांडण्यासाठी विषयाच्या सर्व बाजूंचा सारासार विचार करावा लागतो. विषय मांडण्यासाठी दहा मिनिटे इतका वेळ दिल्यामुळे अधिक विस्ताराने विषय मांडता आला. या स्पर्धेत विषयाच्या आशयाला, त्यातील माहितीचे विश्लेषण करण्याला महत्त्व दिले जाते. त्यामुळे स्पर्धकांचा कस पाहणारी ही स्पर्धा आहे.
– आदित्य कुलकर्णी, साठय़े महाविद्यालय, विलेपार्ले
व्यापक अनुभव मिळाला
आज आम्हा तरूण मुलांना सोशल मिडीयाच्या चौकटीपलीकडे जाऊन व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध नाही. परंतु ‘लोकसत्ता’च्या ‘वक्ता दशसहस्त्रेषु’च्या माध्यमातून अशा प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. कट्टय़ावर बोलण्यापेक्षा चारचौघात निर्भयपणे व अभ्यासपूर्ण विषयाची मांडणी करण्याचा व्यापक अनुभव घेता आला. इतर स्पर्धकांची भाषणेही ऐकल्यामुळे एकाच विषयाला विविध प्रकारे कसे भिडता येते याचा प्रत्यय या स्पर्धेतून मिळाला.
-अथर्व भावे, रामनारायण रुईया महाविद्यालय, माटुंगा
विचारांना चालना मिळाली
या स्पर्धेसाठी देण्यात आलेले विषय आव्हानात्मक होते. त्यामुळे विषयाची तयारी करताना खूप अभ्यास करावा लागला तसेच विचारांना चालना मिळाली. अनेक मानाच्या स्पर्धापैकी ही स्पर्धा असल्याने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवड झाल्याने खूप आनंद झाला आहे. स्त्रियांना समाजात दुटप्पीपणाने वागवले जाते, या विषयावर फारसे बोलले जात नाही. मात्र या स्पर्धेमुळे या विषयावर चर्चा झाली.
– प्रियांका तुपे, साठय़े महाविद्यालय, विलेपार्ले
इतरांना पटवून देण्याची तळमळ हवी
विचार करण्याची आणि ती मांडण्याची एक परंपरा महाराष्ट्रात होती. परंतु ती आता खंडीत झाली आहे. यासारख्या स्पर्धामुळे विचार करण्याच्या प्रक्रियेला नव्याने संजीवनी मिळेल. आताची पिढी काय विचार करते आणि तो कसा मांडते हे या स्पर्धेतून पाहायला मिळाले. चांगले वाचन, इतरांचे ऐकणे, त्यावर विचार करणे यातून आपले प्रबोधन होत असते. आपल्याला इतरांना काही तरी पटवून देण्याची तळमळ असल्याशिवाय स्पर्धेमध्ये प्रभावीपणे विषय मांडता येत नाहीत. ‘लोकसत्ता’च्या स्पर्धेमुळे तरुणांच्या अभिव्यक्तीचे जिवंत अस्तित्व अनुभवायला मिळाले.
– प्रा. अनघा मांडवकर, परीक्षक