मुंबई : आंतरजालावरील माहितीच्या माऱ्यात अचूक तपशील सापडणे सध्या कठीण बनले आहे. ‘चॅट जीपीटी’ तसेच ‘एआय’च्या गोंधळयुगात वर्षभराचा दस्तावेज माहितीरूपात पुरविणारे आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसह माहितीसंग्रहकांना उपयुक्त ठरणारे ‘लोकसत्ता’चे लोकप्रिय पुस्तक ‘वर्षवेध’ आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित होईल.

यंदा पूर्णपणे नव्या स्वरूपात अधिक माहिती तसेच अधिक तपशिलांनी सजविलेल्या या पुस्तकात २०२४ सालात घडलेल्या घटना, या वर्षाचे खास मानकरी अशी भरगच्च मजकुराची पर्वणी आहे. लेखक, पत्रकार, विश्लेषक, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार आणि माहिती संग्राहकांसाठी गेल्या दशकभरापासून ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून ‘वर्षवेध’ पुस्तकाचा उपक्रम राबविला जातो. पहिल्या वर्षापासूनच प्रचंड प्रतिसादामुळे या पुस्तकाचे अनेक वेळा पुनर्मुद्रण केले जाते. वर्षातील प्रत्येक महत्त्वपूर्ण गोष्टीची इत्थंभूत खबरबात या अंकामध्ये सापडेल.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण…

अमेरिकी आणि भारतीय निवडणूक, पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे आत्तापर्यंतचे सर्वात उष्ण ठरलेले वर्ष, वाळवंटात पडलेला मुसळधार पाऊस, आखाती देशातील पूर आदींचे सचित्र तपशील अंकात आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींइतक्याच राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील संपूर्ण वर्षभरातील महत्त्वपूर्ण घटना यात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत.

खास आकर्षण…

अशक्य स्थितीतून अमेरिकेच्या अध्यक्षपदावर पुन्हा विराजमान झालेले डोनाल्ड ट्रम्प आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर पुन्हा आलेले देवेन्द्र फडणवीस, पर्यावरणाच्या कामासाठी जागतिक सन्मान मिळविणारे माधव गाडगीळ, बुद्धिबळात अगदी लहान वयात जगज्जेता बनलेला गुकेश, जागतिक चित्रपट विश्व गाजवणारी भारतीय दिग्दर्शिका पायल कपाडिया हे २०२४ सालाचे खरेखुरे मानकरी. मान्यवर लेखकांनी त्यांचा घेतलेला वेध यंदा ‘वर्षवेध’चे खास आकर्षण असेल.

Story img Loader