मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेचा भविष्यपट मांडणारा २०२३-२४ सालचा केंद्रीय अर्थसंकल्प, आज बुधवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत मांडतील. थोरामोठय़ांचे बोल, म्हणी-वाक्प्रचार, कवितांच्या ओळींची रेलचेल, आकडय़ांची गुंतागुंत आणि जमाखर्चाचा लेखाजोखा या पलिकडे अर्थमंत्र्याच्या भाषणाचे नेमके सार आणि त्यामागील अर्थाचा उलगडा ‘लोकसत्ता विश्लेषण’ या विशेष अर्थसंकल्पोत्तर कार्यक्रमातून अर्थसंकल्पदिनीच सायंकाळी केला जाणार आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदी आणि घोषणांचा वेध घेणारा हा ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रम बुधवार, १ फेब्रुवारीला सायंकाळी ६.१५ वाजता, महाराष्ट्र सेवा संघ, पंडित जवाहरलाल नेहरू मार्ग, अपना बाजाराच्या वर, मुलुंड (पश्चिम) या ठिकाणी होत आहे.
‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर आणि वरिष्ठ सनदी लेखापाल दीपक टिकेकर हे अर्थमंत्र्यांपुढे असणारी आव्हाने पाहता त्यांनी साधलेल्या कसरतींचा या निमित्ताने आढावा घेतील. पॉवर्ड बाय – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आणि विनामूल्य आहे.
आशा-अपेक्षांचे मोठे ओझे हे प्रत्येक अर्थसंकल्पाकडून वाहिले जात असते. त्यामुळे सूट, सवलती, करमाफी, तरतुदीत वाढीच्या अपेक्षा यंदाही आहेतच. वाढती महागाई आणि घटती क्रयशक्ती पाहता, लोकांच्या उत्पन्नाची पातळी वाढेल, निदान करांचा भार तरी कमी होईल, असे सर्वसामान्यांना वाटणेही स्वाभाविक आहे. प्रत्यक्षात याची अर्थसंकल्पाकडून कशी आणि कितपत दखल घेतली जाते, याबद्दल उत्सुकता आहे.
यंदाचा हा अर्थसंकल्प म्हणजे केंद्रातील विद्यमान सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. पुढील वर्षांत होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुका पाहता अर्थसंकल्पातील धोरणांची दिशा मतपेटीवर नजर ठेवणारी आणि लोकानुनयाचा सोपा मार्ग अनुसरणारी असेल काय? की रोजगार निर्मितीसाठी पायाभूत सुविधांमध्ये अधिक गुंतवणूक, ग्रामीण अर्थव्यवस्थेला गतीमान करण्यासाठी शेतीच्या उत्पन्नाला चालना आणि त्यायोगे परदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी अनुकूल वातावरणनिर्मिती याला अर्थमंत्री प्राधान्यक्रम देतील? अशा प्रत्येक पैलूचा सर्वागाने वेध घेणाऱ्या या कार्यक्रमात आपणा सर्वाचा सहभाग अगत्याचाच!
* कधी : बुधवार, १ फेब्रुवारी २०२३
* वेळ : सायंकाळी ६.१५ वाजता
* वक्ते : गिरीश कुबेर, संपादक, लोकसत्ता दीपक टिकेकर, करसल्लागार
*स्थळ : महाराष्ट्र सेवा संघ, पंडित जवाहरलाल नेहरू मार्ग, मुलुंड (पश्चिम)