उच्च शिक्षणाची दिशा निश्चित करणारा महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या दहावीच्या वर्षांत विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी ‘लोकसत्ता’ने यंदाही ‘यशस्वी भव’ उपक्रम हाती घेतला आहे. सोमवारपासून दैनंदिन लेखमाला प्रसिद्ध करण्यात येणार असून त्याद्वारे परीक्षेचे तंत्र समजावून घेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास जास्त कसा होईल आणि परीक्षेचा बागुलबुवा कमी कसा होईल, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील. वर्षभर सुरू राहणाऱ्या या लेखमालेत दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासाविषयी अनुभवी शिक्षकवर्गाकडून अचूक मार्गदर्शन लाभेल.
या लेखमालेत अभ्यासक्रमावर आधारित स्वाध्याय, प्रश्नपत्रिका यांसोबत अभ्यासाचे तंत्र-मंत्र आणि विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा मूड कायम राहण्याच्या दृष्टीने समुपदेशनाचे काही लेख देण्यात येणार आहेत. यात प्रसिद्ध होणाऱ्या मार्गदर्शनपर लेखांसाठी अनुभवी, तज्ज्ञ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. लेखनाची मांडणी पाठय़पुस्तकानुसार विभागवार करण्यात आली आहे.
या लेखमालेत सोमवार ते शुक्रवार मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी, तर शनिवारी आणि रविवारी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी लेख प्रसिद्ध केले जातील. यात मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य गणितासह सर्व विषयांचे मार्गदर्शन केले जाईल, तर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र वगळता इतर सर्व विषयांचे मार्गदर्शन उपलब्ध होईल. या लेखमालेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाठय़पुस्तकातील महत्त्वाच्या घटकांचे विश्लेषण केले जाणार आहे. त्याचबरोबर प्रश्नोत्तरे, सरावासाठी उत्तरांसह हॉटस्, बहुपर्यायी प्रश्न, प्रश्नसंच आणि सराव पत्रिकांचा यात समावेश असेल. याशिवाय वैशिष्टय़पूर्ण टिपांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावेल आणि व्यक्तिमत्त्व विकासाला हातभार लागेल. अतिरिक्त तणाव न घेता, नियमित अभ्यासाने तुम्ही निश्चित केलेले दहावीच्या परीक्षेतील मार्काचे लक्ष्य साध्य करण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या ‘यशस्वी भव’ लेखमालिकेची विद्यार्थ्यांना निश्चितच मदत होईल. यशस्वी भव!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा