पेण तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती आणि पिण्यासाठी हेटवणे धरणाचे पाणी उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी प्रा. एन. डी. पाटील आणि आमदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेण ते मुंबईतील मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असा ‘लाँग मार्च’ काढण्यात येणार आहे. शनिवारी, ९ फेब्रुवारीपासून हा मार्च सुरू होणार असून १२ फेब्रुवारीस वर्षां निवासस्थानी पोहोचणार आहे.
हेटवणे प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील रिलायन्सचा ‘महामुंबई सेझ’ रद्द झाल्यानंतर हेटवणे धरणातील पाणी पेण तालुक्यातील शेतकऱ्यांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी उपलब्ध व्हावे, अशी मागणी करण्यात आली होती. १० वर्षे झाल्यानंतरही या धरणाच्या कालव्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यासाठी लागणारी अर्थसंकल्पीय तरतूद राज्य शासनाने केली नसून वारंवार त्यात चालढकल करण्यात येत असल्याचा आरोप प्रा. पाटील यांनी केला. पेण तालुक्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असून हेटवणे धरणामध्ये पाण्याचा पूर्ण साठा असूनही ते पाणी तसेच ठेवले असल्याचा आरोपही त्यांनी केला. या धरणातील पाणी शहापाडा धरणामध्ये सोडले तर तालुक्यातील पाण्याची टंचाई दूर होईल, असे आमदार धैर्यशील पाटील यांनी सांगितले.
हेटवण्याचे पाणी पेण तालुक्यातील जनतेला मिळावे यासाठी आता सरकारला जागे करण्याची वेळ आली असून शनिवार ९ फेब्रुवारीस पेण येथून दोन हजार शेतकरी पिण्याच्या पाण्याच्या कळशा आणि कावडी घेऊन लाँग मार्च सुरू करतील. १० फेब्रुवारीस खारघर येथे तर ११ फेब्रुवारीस चेंबूर येथे हे शेतकरी पोहोचतील. १२ फेब्रुवारीस दुपारी १२ वाजेपर्यंत हा लाँग मार्च वर्षां बंगल्यावर पोहोचेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी मोर्चामध्ये १० हजारहून अधिक शेतकरी सहभागी होतील, असेही त्यांनी
सांगितले.