मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीत मतदानासाठी रांगा लागत आहेत. धारावीतील वस्त्यांवस्त्यांसमोर विविध राजकीय पक्षांचे माहिती देणारे कक्ष लागले आहेत. या कक्षांभोवती नागरिकांचे घोळके जमत आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई व शिवसेनेचे शिंदे गटाचे राहुल शेवाळे या दोन उमेदवारांमध्ये दक्षिण मध्य मुंबईत लढत रंगत आहे. सध्या धारावी पुनर्विकासाचा मुद्दा बहुचर्चित आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाची चर्चा मतदानादिवशीही धारावीच्या चौकाचौकात रंगली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी धारावीतील मतदान केंद्र व वस्त्यांवस्त्यांसमोर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा – भांडुपमध्ये उद्धव ठाकरे गटाचे दोन कार्येकर्ते पोलिसांच्या ताब्यात
हेही वाचा – मुंबईत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी विविध ठिकाणी गुन्हे दाखल
रखरखत्या उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले असून अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. काहीजण झाडाच्या सावलीत उभे राहून क्षणभर विश्रांती घेत आहेत. मतदान केंद्रात भ्रमणध्वनी तसेच बॅग घेऊन जाण्यास बंदी असल्यामुळे बहुसंख्य तरुणांना तसेच नागरिकांना मतदान केंद्रांबाहेरच रोखले जात आहे. त्यामुळे पोलीस आणि तरुणाईमध्ये शाब्दिक चकमकही रंगत आहे. काही ठिकाणी या नियमांमुळे वादही निर्माण होत आहेत. मतदान केंद्रांबाहेर व आसपास दुचाकी वाहने लावण्यासही पोलीस देत नसल्यामुळे, अनेकजण हे मतदान केंद्रावरून घरी जाऊन भ्रमणध्वनी व बॅग ठेऊन पुन्हा मतदान केंद्रावर येत आहेत. या सर्व गडबडीत कामावर जाण्यास उशीर होत असल्यामुळे अनेकांचे वादही होत आहेत.