मुंबई: दादर पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरात धुळीमुळे होणारे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई आयआयटीने दिलेल्या अहवालानुसार अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना अंमलात आणण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्यात रोलरद्वारे मातीचा स्तर नियंत्रित करणे, धूळ नियंत्रणासाठी मातीवर सातत्याने पाणी फवारणे यांसारख्या अल्पकालीन उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच परिसरातील वाऱ्याच्या वेगाचा सर्वंकष अभ्यास करुन त्यासंबंधी तोडगा काढणे आदींचा दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये समावेश आहे.
दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) परिसरात लाल मातीचा धुरळा मोठ्या प्रमाणावर उडत असल्यामुळे प्रदूषण होत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी वारंवार केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मैदानात प्रत्यक्ष भेट दिली. प्रभावी निराकरण पद्धती अंमलात आणून प्रदूषण नियंत्रणात आणण्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाला त्यांनी दिले होते.
हेही वाचा >>>गोराई आगारातील बसने तरुणाला चिरडले,भाडेतत्वावरील बस अपघातांच्या घटनांचे सत्र सुरुच
त्या अनुषंगाने, याप्रकरणी दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून भारतीय तंत्रज्ञान संस्था (मुंबई) येथे कार्यरत पर्यावरण तज्ज्ञ प्रा. वीरेंद्र सेठी यांचा सल्ला घेण्यात आला. त्यांनी काही महत्वपूर्ण निरीक्षणे नोंदवत शिफारसी केल्या आहेत. त्यात अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा दोन प्रकारच्या उपाययोजनांचा समावेश आहे.
हेही वाचा >>>वृद्धापकाळातील आरोग्य सेवा गतिमान करणार! वर्षभरात साडेदहा लाख वृद्धांवर उपचार…
अल्पकालीन उपाययोजनांमध्ये धुलीकणांचे उत्सर्जन रोखण्यासाठी तसेच वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी तातडीच्या तात्कालिक उपाययोजना करण्याचे सुचविण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने रोलर संयंत्राचा वापर करणे, धूळ नियंत्रणात ठेवून मैदानातील माती स्थिर ठेवण्यासाठी सातत्याने पाणी फवारणी करणे यांचा अंतर्भाव आहे. या उपाययोजनांची महानगरपालिका प्रशासनाने तातडीने अंमलबजावणी सुरू केली आहे.
दीर्घकालीन व्यापक उपाययोजनांमध्ये वाऱ्याचा प्रवाह, इतर संबंधित घटकांचा तपशीलवार अभ्यास करणे आणि प्रत्यक्ष कार्यवाहीवर आधारित नियोजन करणे, आदींचा समावेश आहे. पर्यावरण तज्ज्ञांनी सुचविलेल्या या शिफारशींच्या अनुषंगाने वायू प्रदूषण कमी करण्यासाठी एक शाश्वत आणि सर्वसमावेशक उपाय विकसित करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे. त्यासाठी आता वाऱ्याच्या वेगाचा अभ्यास करण्यात येणार आहे.