पहाटे पाच ते रात्री साडेअकरादरम्यान मेट्रो, एमएमआरडीएकडून वेळापत्रक निश्चित
मंगल हनवते
मुंबई : मुंबईकरांच्या सेवेत महिन्याभरात दोन नवीन मेट्रो मार्गिका दाखल होणार आहेत. ‘मेट्रो २ अ’ (दहिसर ते डीएन नगर) आणि ‘मेट्रो ७’ (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) मार्गिकेतील पहिल्या टप्प्यावर मेट्रो धावणार असून यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) सज्ज झाले आहे. त्यानुसार एमएमआरडीएने वेळापत्रक निश्चित केले आहे. या वेळापत्रकानुसार पहाटे पाच ते रात्री साडेअकरादरम्यान ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ची सेवा सुरू असणार आहे. डहाणूकरवाडी मेट्रो स्थानकातून सकाळी ५ वाजून ७ मिनिटांनी तर आरे मेट्रो स्थानकातून सकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी पहिली गाडी सुटणार आहे. तर डहाणूकरवाडी मेट्रो स्थानक येथून रात्री १० वाजून ३९ मिनिटांनी, तर आरेतून रात्री ११ वाजून २२ मिनिटांनी शेवटची गाडी सुटणार आहे. प्रत्येक १० मिनिटे ३७ सेकंदाने मेट्रो सुटणार आहे.
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर ‘मेट्रो १’ सकाळी साडेसहा ते रात्री अकरा या दरम्यान सेवा देते. पण ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ची सेवा पहाटे पाच वाजता सुरू होणार असून रात्री साडेअकरापर्यंत सेवा सुरू असणार आहे. ‘मेट्रो २ अ’मधील पहिला टप्पा डहाणूकरवाडी ते आनंदनगर असा आहे. तर ‘मेट्रो ७’चा पहिला टप्पा दहिसर ते आरे असा आहे. या दोन मार्गिका असल्या तरी यांचा रूळ एकच असून टर्मिनल स्थानक एकच आहे. या दोन्ही मार्गिकेसाठी पहिल्या टप्प्यात डहाणूकरवाडी आणि आरे टर्मिनल स्थानक आहे. त्यामुळे मार्चमध्ये या दोन्ही मेट्रो मार्गिका सेवेत दाखल झाल्या तर या दोन्ही मार्गिकेसाठी डहाणूकरवाडी स्थानकातून, तसेच आरे मेट्रो स्थानकातून पहिली आणि शेवटची गाडी सुटणार आहे.
महिलांसाठी राखीव डबा
लोकलप्रमाणे ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’मध्येही महिलांसाठी विशेष सोय असणार आहे. सहा डब्यांच्या मेट्रो गाडीतील एक डबा महिलांसाठी राखीव असणार आहे. एमएमआरडीएने ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’च्या पहिल्या टप्प्यासाठी १० मेट्रो गाडय़ा सज्ज केल्या आहेत. देशी बनावटीच्या या गाडय़ांची बांधणी बंगळूरुमध्ये करण्यात आली आहे. १० गाडय़ा असल्या तरी प्रत्यक्षात ८ गाडय़ाच दररोज धावणार आहेत. एक गाडी राखीव ठेवली जाणार असून एक गाडी दुरुस्ती, देखभालीसाठी असणार आहे.
मेट्रो स्थानकावरील फलाटावर काचेची सुरक्षा भिंत
लोकलमधून उतरताना रुळावर पडण्याच्या, प्लॅटफॉर्मवरून उडय़ा मारण्याच्या घटना, अपघात घडतात. मेट्रो २ अ आणि ७ मध्ये मात्र अशा घटना, अपघात घडणार नाहीत. कारण या प्रकल्पात मेट्रो स्थानकातील फलाटावर ‘प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर सिस्टीम’ (पीएसडी) कार्यान्वित करण्यात येणार आहे. एकार्थाने मेट्रो स्थानकावरील फलाटावर काचेची सुरक्षा भिंत उभारण्यात येणार आहे. ही भिंत गाडी स्थानकात दाखल झाल्यानंतर गाडीचे प्रवेशद्वार असेल तितकीच खुली होईल आणि गाडी गेली की बंद होईल.