गेल्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. गारपीटचे संकट कोसळले. त्यामुळे शेतीवर विपरीत परिणाम झाला आहे. वातावरणात सातत्याने होत असलेला बदलाकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे, अशी चिंता व्यक्त करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागरिकांना प्रदूषणाबाबत अधिक सजग राहण्याचे आवाहन केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने अंधेरी येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पर्यावरणमंत्री संजय देवतळे आणि पर्यावरण राज्यमंत्री सचिन अहिर उपस्थित होते.
पर्यावरणाबाबत नागरिक सजग झाले आहेत. मात्र गणेशोत्सव, दिवाळी आदी सणांच्या माध्यमातून होणाऱ्या प्रदूषणाबाबत नागरिकांनी अधिक जागरूकता बाळगणे गरजेचे आहे, असे सांगून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, सांडपाण्याच्या व्यवस्थापनाचा मुद्दा कळीचा बनला आहे. त्यासाठी सांडपाण्याच्या मार्केटिंगची संकल्पना मांडण्यात आली. घनकचऱ्यापासून ऊर्जानिर्मितीची संकल्पनाही मांडण्यात आली आहे.
नॉर्वे दूतावास आणि टेरी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायन्स पॉलिसी डायलॉग ऑन एक्स्ट्रीम इव्हेन्ट्स अ‍ॅण्ड अ‍ॅडॉप्टेशन इन महाराष्ट्र’ या विषयावर चर्चासत्राचेही या वेळी उद्घाटन करण्यात आले. प्रदूषण नियंत्रण व समृद्ध पर्यावरणासाठी झटणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘वसुंधरा पुरस्कार – २०१४’चे, तसेच मुंबईतील पर्यावरणविषयक समस्यांशी निगडित ‘फोटोथॉन २०१४’ स्पर्धेच्या पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
‘लोकसत्ता’ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने ‘ग्लोबल वॉर्मिग’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. गेल्या १०० वर्षांतील ग्लोबल वॉर्मिगचा वाढता प्रभाव, वर्तमानकाळातील स्थिती व भविष्यातील याचे स्वरूप या विषयावर या पुस्तकात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
पर्यावरणासंबंधी कायद्यांचे पालन करण्यास उद्योजकांना मार्गदर्शक ठरणारी ‘पर्यावरण कवच’ या माहिती पुस्तिकेचे, तसेच भारतातील वटवाघळांवर आधारित ‘आपली वटवाघळं’ या पुस्तकाचे प्रकाशनही या वेळी करण्यात आले. ‘आपलं पर्यावरण’ या मासिकासह महाराष्ट्र जल गुणवत्ता अहवाल (२०१३-२०१४), महाराष्ट्र राज्य हवा गुणवत्ता अहवाल (२०१३-२०१४) आणि महाराष्ट्र राज्य नागरी घनकचरा व्यवस्थापन अहवाल (महानगरपालिका २०१३-२०१४) यांचे प्रकाशनही या वेळी करण्यात आले होते.

Story img Loader