मुंबई: शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीमध्ये प्रचंड तोटा झाल्याने एका तरुणाने स्वतःवर गोळी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी भांडुप परिसरात घडली. भांडुप पोलिसांनी या घटनेची नोंद करून तपास सुरू केला आहे.

भांडुपमधील सुभाष नगर परिसरातील म्हाडा वसाहतीमध्ये कुटुंबासोबत वास्तव्यास असलेल्या मनोज भोसले (३८) याने शेअर्स बाजारात गुंतवणूक केली होती. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजार कोसळत असल्यामुळे मनोजला मोठ्या प्रमाणावर तोटा झाला होता. त्यामुळे तो प्रचंड अस्वस्थ झाला होता. गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावाखाली होता. त्यातूनच त्याने बुधवारी पहाटे घराबाहेर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.मनोजने आत्महत्येचा प्रयत्न केला त्यावेळी घरात पत्नी आणि मुले होती. ही बाब लक्षात येताच त्यांनी मनोजला तत्काळ भांडुपमधील एका खासगी रुग्णालायत दाखल केले.

मनोजच्या मानेला गोळी चाटून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच भांडुप पोलिसांनी मनोजच्या पत्नीचा जवाब नोंदवून घेतला आणि तपास सुरू केला. मनोजकडे बंदूक कुठून आली याबाबत पोलीस तपास करीत आहेत.