बेस्टच्या ‘पांढऱ्या हत्तींना’अखेर चाप
बेस्टसाठी ‘पांढरा हत्ती’ ठरलेल्या वातानुकूलित बसेस बंद करण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला आहे. गेल्या पाच वर्षांत किंगलाँगच्या २० वातानुकूलित बसगाडय़ांच्या देखभालीवर तब्बल २८७ कोटी रुपये खर्च झाले आहेत.
प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन बेस्टने २००७ मध्ये वातानुकूलित बस सेवा सुरू केली. त्यासाठी किंगलाँगच्या बसगाडय़ा घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी केवळ २० गाडय़ा आज ताफ्यात असून त्यांच्यावर आजपर्यंत २८७ कोटी ७६ लाख रुपये खर्च झाले. या गाडय़ा मोठय़ा असल्याने त्या वाहतुकीलाही अडथळा ठरतात. प्रवाशांनीही या बसगाडय़ाकडे पाठ फिरवायला सुरुवात केली आहे. जवळच्या अंतरासाठी ही बसगाडी सोडावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे वरळी, दादर, बोरिवली, अणुशक्तीनगर येथे हब तयार करण्यात येणार असून बाहेर गावाहून अथवा उपनगरांतून येणाऱ्या गाडय़ांचे वेळापत्रक विचारात घेऊन या बसगाडय़ा सोडण्याचा बेस्टचा विचार आहे.
प्रशासनाने वातानुकूलित बसगाडय़ांबाबत तयार केलेला कृती आराखडा बेस्ट समितीच्या मंगळवारच्या बैठकीत सादर करण्यात आला होता.
बेस्टच्या ताफ्यातील २९० पैकी केवळ १९० वातानुकूलित बसगाडय़ा रस्त्यावर धावताना दिसतात. काही मार्गावर एकामागोमाग दोन बसगाडय़ा सोडल्या जातात आणि प्रवासी नसल्याचे कारण पुढे केले जाते, असा आक्षेप शिवसेनेचे सुनील गणार्चाय यांनी घेतला.
ज्या कंपनीचे कार्यालय अथवा कारखाना भारतात कुठेही नाही अशा बसगाडय़ा खरेदी करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध कडक करावी, अशी मागणी करीत काँग्रेसचे शिवजी सिंह यांनी बेस्टचे माजी महाव्यवस्थापक उत्तम खोब्रागडे यांच्यावर टीका केली. वातानुकूलित बसगाडय़ांमुळे होणारा तोटा लक्षात घेऊन त्या बंद करण्याच्या निर्णयाप्रत प्रशासन आले आहे. या बसगाडय़ा भंगारात काढण्याऐवजी भाडय़ाने देण्याचा विचार सुरू आहे.

नगरसेवकांना वातानुकूलित बसचा पास हवा
बेस्टच्या तोटय़ात भर घालणाऱ्या वातानुकूलित बसगाडय़ांमधून मोफत सैर करण्याची मनीषा नगरसेवक बाळगून आहेत. नगरसेवकांना बेस्टच्या वातानुकूलित बसचा पास द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे अरुण दुधवडकर यांनी केली. शिवसेनेचे रंजन चौधरी यांनी त्यास पाठिंबाही दिला. तसेच बेस्ट समिती अध्यक्ष नाना आंबोले यांनीही या मागणीस अनुकूलता दर्शविली. मात्र तोटय़ातून बेस्टला बाहेर काढण्यासाठी धडपडणाऱ्या प्रशासनाने मात्र यावर मौन घेतले.

Story img Loader