जयपूर आणि चंडीगड येथे वकिलांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वकिलांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयासह कनिष्ठ न्यायालयातील कामकाजावर बहिष्कार टाकला होता. या बहिष्काराचा उच्च न्यायालयातील कामकाजावर मोठय़ा प्रमाणात परिणाम झाला नसला, तरी कनिष्ठ न्यायालयातील कामकाजावर मात्र मोठा परिणाम झाला.
उच्च न्यायालयात बहिष्काराला वकिलांतर्फे संमिश्र प्रतिसाद मिळाला. ७० टक्के वकिलांनी कामकाजावर बहिष्कार टाकला होता. परंतु कनिष्ठ न्यायालयातील ९० टक्के वकील या बहिष्कारात सहभागी झाल्याने तेथील कामकाजावर मोठय़ा प्रमाणात परिणाम झाल्याची माहिती बार कौन्सिलचे सदस्य व्ही. बी. कोंडेदेशमुख यांनी दिली. वकिलांच्या या बहिष्कारामुळे जलसंपदा सुनील तटकरे यांच्याविरुद्धच्या याचिकेसह बऱ्याच जनहित याचिकांची सुनावणी न्यायालयाला तहकूब करावी लागली.