मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांसाठी १३ सप्टेंबर रोजी काढण्यात येणारी सोडत अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. सोडतीतील अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेसाठी किमान ४५ दिवसांचा कालावधी देणे बंधनकारक असताना विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा धसका घेत मुंबई मंडळाने या प्रक्रियेसाठी केवळ २६ दिवसांचा कालावधी दिला होता. हा कालावधी कमी असल्याने निर्धारित वेळत कागदपत्रांची पूर्तता करू न शकणारे इच्छुक सोडतीपासून वंचित राहणार होते. ही बाब लक्षात घेता अखेर म्हाडा प्राधिकरणाने मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या सोडतीतील अर्जविक्री-स्वीकृतीला १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. आता ४ सप्टेंबरऐवजी इच्छुकांना १९ सप्टेंबरपर्यंत अनामत रक्कमेसह अर्ज सादर करता येणार आहे. मात्र त्याच वेळी १३ सप्टेंबरची सोडत लांबणीवर गेली असून लवकरच सोडतीची नवीन तारीख जाहीर करण्यात येणार आहे.
मुंबईतील विविध ठिकाणच्या २०३० घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध करत मंडळाने ९ ऑगस्टपासून अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात केली. मात्र या प्रक्रियेसाठी केवळ २६ दिवसांचाच कालावधी देण्यात आला होता. या प्रक्रियेसाठी किमान ४५ दिवसांचा कालावधी दिला जातो. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सोडत काढण्याची घाई केली जात होती. त्यामुळे म्हाडाने घाईत निर्णय घेत आचारसंहिता लागू होण्याच्या भीतीने १५ सप्टेंबरपूर्वी सोडत काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अर्जविक्री-स्वीकृतीसाठी ९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यानचा कालावधी देण्यात आला होता. मात्र हा कालावधी कमी असल्याने अधिवास, उत्पन्नाचा दाखला, प्राप्तीकर प्रमाणपत्र आदी कागदपत्रे कशी उपलब्ध होणार हा प्रश्न अनेक इच्छुकांसमोर उभा ठाकला. त्यामुळे अनेकांनी या सोडतीसाठी अर्ज भरण्याचा निर्णय रद्द केल्याची चर्चा आहे. त्यामुळेच सोडतीला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचेही चित्र आहे. २०३० घरांसाठी ५० हजाराच्या आतच अर्ज सादर होण्याची शक्यता निर्माण झाली. या सर्व पार्श्वभूमीवर तसेच महत्त्वाचे म्हणजे आचारसंहिता लांबणीवर पडल्याने म्हाडाने अखेर १३ सप्टेंबरची सोडत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. तसेच अर्जविक्री-स्वीकृतीस मुदतवाढ दिली. अर्जविक्री-स्वीकृतीला १५ दिवसांची अर्थात १९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली. तर १३ सप्टेंबर रोजी होणारी सोडत पुढे गेली असून सोडतीची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही सावे यांनी सांगितले.
हेही वाचा >>>IIT Bombay Research : रस्ता न चुकता प्राणी स्वगृही कसे परततात?यंत्रमानवाच्या सहाय्याने आयआयटी मुंबईचे संशोधन
श्री आणि श्रीमती निवासी म्हाडाच्या योजना पोहचविणार सर्वसामान्यांपर्यंत
म्हाडाच्या योजना, निर्णय, सोडत संगणकीय प्रणाली, उपकरप्राप्त आणि म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासंबंधीची माहिती यासह म्हाडासंदर्भातील सर्व प्रकारची माहिती आता सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी श्री आणि श्रीमती निवासी यांच्यावर म्हाडाने सोपविली आहे. श्री आणि श्रीमती निवासी म्हणजेच म्हाडाचे ‘शुभंकर’ चिन्ह (मॅस्काॅट) असून या चिन्हाचे बुधवारी सावे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. नागरिक, लाभार्थ्यांशी संवाद साधून म्हाडाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी म्हाडाने शुभंकर चिन्ह तयार केले आहे. आता समाज माध्यमांद्वारे श्री आणि श्रीमती निवासी म्हाडाच्या योजना, निर्णय, माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणार आहेत.