मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २२६४ घरांसाठी तीन वेळा पुढे ढकलण्यात आलेल्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. ठाण्याच्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ५ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात येणार आहे.
कोकण मंडळाने २० टक्के योजनेतील ५९४, म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ७२८, १५ टक्के योजनेतील ८२५ घरांसह विखुरलेल्या ११७ अशा एकूण २२६४ घरांच्या सोडतीसाठी ऑक्टोबरमध्ये जाहिरात प्रसिद्ध केली. या २२६४ घरांसाठी ११ ऑक्टोबर २०२४ ला अर्जविक्री-स्वीकृती सुरू करण्यात आली. सोडतीच्या मूळ वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया १० डिसेंबर २०२४ रोजी संपुष्टात येणार होती, तर २७ डिसेंबर २०२४ रोजी सोडत काढण्यात येणार होती. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने सोडतीला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आणि २७ डिसेंबर २०२४ ची सोडत थेट ३१ जानेवारी २०२५ वर गेली. कोकण मंडळाने नुकतीच अर्जविक्री-स्वीकृतीची प्रक्रिया पूर्ण करून ३१ जानेवारीला सोडत काढण्याची तयारी सुरू होती. मात्र ही सोडत काही कारणाने तिसऱ्यांदा पुढे ढकलण्याची नामुष्की मंडळावर ओढवली. पण आता मात्र अखेर मंडळाला सोडतीसाठी मुहूर्त मिळाला आहे. येत्या ५ फेब्रुवारी रोजी ठाण्यात २२६४ घरांसाठी सोडत काढण्यात येणार असल्याचे कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी सांगितले.
दरम्यान, या सोडतीसाठी २४ हजार ९११ अर्ज अनामत रक्कमेसह सादर झाले होते. यापैकी २४ हजार ५६७ अर्ज पात्र ठरले असून या पात्र अर्जदारांची अंतिम यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध करण्यत आली. येत्या ५ फेब्रुवारीला काढण्यात येणार्या सोडतीत २४ हजार ५६७ अर्जदार सहभागी होणार आहे.