मागील महिन्याभरापासून म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५३११ घरांच्या सोडतीसाठीच्या २५ हजार अर्जदारांची सोडतीची प्रतीक्षा अखेर आता संपणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनी, २६ जानेवारीला सोडतीसाठी वेळ देण्याचे आश्वासित केले आहे. त्यानुसार २६ जानेवारीला सोडत काढण्याच्यादृष्टीने कोकण मंडळ सोडतीच्या तयारीला लागले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांची वेळ निश्चित झाल्यानंतरच म्हाडाकडून सोडतीची घोषणा होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> महालक्ष्मी रेसकोर्सवर कोणतेही बांधकाम नाही, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची सदस्यांना ग्वाही

कोकण मंडळाकडून सप्टेंबरमध्ये ५३११ घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध करत अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली. मुळ वेळापत्रकानुसार ७ जानेवारीला सोडत काढण्यात येणार होती. मात्र अर्जविक्री-स्वीकृतीला प्रतिसाद न मिळाल्याने ही सोडत पुढे ढकलत कोकण मंडळाने अर्जविक्री-स्वीकृतीला मुदतवाढ दिली. मुदतवाढीनुसार सोडतीची तारीख १३ डिसेंबर अशी जाहिर करण्यात आली. अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया संपुष्टात आली. पात्र अर्जदारांची यादी जाहिर करण्यात आली. मात्र १३ डिसेंबरला अधिवेशन असणार असल्याने आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडत काढावयची असल्याने म्हाडाने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात १३ डिसेंबरची सोडतही पुढे ढकलली. ही सोडत पुढे ढकलतानाच म्हाडाने लवकरच सोडतीची नवीन तारीख जाहिर करु असे जाहिर केले. मात्र कोकण मंडळाकडून तारीख काही जाहिरच होत नव्हती. त्यामुळे अर्जदारांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली. समाज माध्यमातून त्यांनी सोडत जाहिर करण्याची मागणी करत म्हाडाच्या कारभारावर टीकाही केली.

हेही वाचा >>> देशभरातील पन्नास टक्क्यांहून अधिक प्राथमिक शिक्षकांकडे किमान पात्रतेचा अभाव

या पार्श्वभूमीवर अखेर म्हाडा प्राधिकरणाने मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करत सोडतीसाठी वेळ मागितली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी २६ जानेवारीची वेळ देण्याचे म्हाडाला आश्वासित केल्याची माहिती म्हाडातील सुत्रांनी दिली. या अनुषंगाने २६जानेवारीला सोडत काढण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. केवळ मुख्यमंत्र्यांची वेळ अधिकृतपणे निश्चित झाल्यास म्हाडाकडून सोडतीची तारीख जाहिर केली जाण्याची शक्यता आहे. असे असले तरी कोकण मंडळ मात्र २६ जानेवारीच्या अनुषंगाने तयारीला लागले आहे. जागेचा शोध आणि इतर कामांना वेग आला आहे. सोडत म्हाडा भवनात करायची की रंगशारदा सभागृहात वा ठाण्यात यावरही विचार सुरु असून लवकरच याचाही निर्णय अंतिम होण्याची शक्यता आहे. एकूणच २६ जानेवारीला सोडत काढण्याचे आता जवळपास निश्चित झाल्याने विरार-बोळींज योजनेसाठीचे अंदाजे ७५० आणि इतर योजनेसाठीचे २४ हजार ३०३ पात्र अर्जदारांची सोडतीची प्रतीक्षा आता संपणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lottery for 5311 houses of mhada konkan board on january 26 mumbai print news zws
Show comments