मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत पुनर्वसित इमारतीतील मूळ रहिवाशांसाठीच्या ६६३ घरांसाठी शुक्रवारी अखेर म्हाडाच्या मुंबई मंडळाने सोडत काढली. प्रचंड गोंधळाच्या वातावरणात आणि कडक पोलीस बंदोबस्तात सोडत पार पडली. सोडत पार पडल्याने आता ७ एप्रिलासून रहिवाशांना घराचा ताबा देण्याच्या प्रक्रियेला मुंबई मंडळाकडून सुरुवात होणार आहे. मात्र पत्राचाळीत अनेक संतप्त रहिवाशांनी विविध मुद्द्यांवर आक्षेप घेत घराचा ताबा न घेण्याची भूमिका घेतली आहे.

सोडतीस रहिवाशांचा विरोध

पत्राचाळीतील ६६३ रहिवाशी २००८ पासून पुनर्विकासाच्या, हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत होते. विकासकाने प्रकल्प अर्धवट सोडल्याने, आर्थिक गैरव्यवहार केल्याने प्रकल्प रखडला होता. पण शेवटी राज्य सरकारने हा प्रकल्प विकासकाकडून काढून घेतला आणि म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे वर्ग केला. हा प्रकल्प आपल्याकडे आल्यानंतर मंडळाने आवश्यक ती कार्यवाही करत काही वर्षांपूर्वी अर्धवट अवस्थेतील पुनर्वसित इमारतींच्या कामाला सुरुवात केली. त्यानुसार इमारतींची कामे पूर्ण करून, इमारतींना निवासा दाखला प्राप्त करून घेतला.

अखेर शुक्रवार, ४ एप्रिल रोजी ६६३ घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय मुंबई मंडळाने घेतला. मात्र कामाच्या दर्जासह इतर बाबींवर आक्षेप घेत रहिवाशांनी या सोडतीला विरोध केला होता. सोडत न काढण्याबाबतचा ठरावही सोसायटीने विशेष सर्वसाधारण सभेत मांडला होता. मुंबई मंडळ मात्र सोडतीवर ठाम होते. त्यानुसार मुंबई मंडळाने रहिवाशांचा विरोध लक्षात घेता पोलीस बंदोबस्तात सोडत काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी सकाळी ११ वाजता गोरेगाव येथे सरदार वल्लभभाई सभागृहात प्रचंड गोंधळाच्या वातावरणात सोडत पार पडली.

सोडत पार पडल्याने आता पात्रता निश्चिती पूर्ण होऊन पात्र ठरलेल्या ६२९ रहिवाशांना ७ एप्रिलपासून घराचा ताबा देण्यास सुरुवात केली जाणार असल्याचे मुंबई मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.

कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित

सोडत पार पडल्याने आता ताबा देण्यात येणार असला तरी पत्राचाळीतील अनेक रहिवाशांनी ताबा घेण्यास विरोध केला आहे. सोडतीच्या एक दिवस आधी इमारतींचे प्लास्टर पडल्याचा आरोप करत मुंबई मंडळाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मंडळाने मात्र दुरुस्तीसाठी मंडळाकडूनच प्लास्टर काढण्यात आल्याचे स्पष्ट करत रहिवाशांचा आरोप फेटाळला आहे. असे असले तरी रहिवासी संतप्त झाले असून सोडतीनंतरही पत्राचाळीत प्रचंड गोंधळ सुरू होता. आता रहिवासी पुढे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.