या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

म्हाडाच्या पुणे मंडळातील ५२११ घरांसाठी आज (गुरुवार) सोडत काढण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुरदृश्यप्रणालीद्वारे सोडत काढण्यात आली. ५२११ घरांसाठी सुमारे ७१ हजार ७४२ सादर झाले होते.

पुणे मंडळाकडून अर्जविक्री-स्वीकृती आणि सोडतपूर्व प्रक्रिया पूर्ण करून आज सोडत काढण्यात आली. मुळात ही सोडत २९ जुलैला काढण्यात येणार होती. मात्र म्हाडाच्या सोडतीच्या उत्पन्न मर्यादेत राज्य सरकारकडून बदल करण्यात आला. त्यामुळे नवीन उत्पन्न मर्यादेसह अर्ज भरून घेणे गरजेचे झाल्याने संगणकीय प्रणालीत तसे बदल करून पुणे मंडळाने जुलैमध्ये अर्जस्वीकृती सुरू केली. या पार्श्वभूमीवर साहजिकच सोडत पूर्व प्रक्रियेला मुदतवाढ देऊन सोडत २९ जुलैऐवजी १८ ऑगस्टला निश्चित करण्यात आली होती.

या सोडतीत पुणे,पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ५२११ घरांचा समावेश आहे. यात २० टक्के योजनेतील २०८८, म्हाडा पंतप्रधान आवास योजनेतील १७०, म्हाडा गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्राधान्य गटातील २६७५ आणि म्हाडाच्या विविध योजनेतील २७९ घरांचा समावेश आहे. या सोडतीद्वारे ५२११ अर्जदार विजेते ठरले असून आता पुढे त्यांची पात्रता निश्चिती पूर्ण करून त्यांना घरांचा ताबा देण्यात येणार आहे. गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काढण्यात आलेल्या सोडतीतील पहिले विजेते सागर खैरनार ठरले आहेत.

प्रतीक्षा यादीचा समावेश –

म्हाडा सोडतीतील घरवाटपात प्रतीक्षा यादीच्या प्रक्रियेअंतर्गत भ्रष्टाचार होत असल्याचे सांगून काही महिन्यांपूर्वी तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतीक्षा यादी कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी औरंगाबाद येथील घरांच्या सोडतीपासून करण्यात आली. असे असले तरी पुणे मंडळाची आजची सोडत प्रतीक्षा यादीसह काढण्यात आली आहे. त्यामुळे अर्जदारांसाठी हा दिलासा मानला जात आहे.

परवडणारी घरे देण्यास सरकार कटिबद्ध –

सर्वसामान्यांना परवडणारी घरे देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असेल असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. म्हाडाच्या ५२११ घरांसाठी ७२ अर्ज सादर होणे यावरून म्हाडाची विश्वासाहर्ता दिसून येत आहे. राज्यात अधिकाधिक परवडणारी घरे देण्यासाठी म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल. पोलिसांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचाही प्रयत्न असेल असेही त्यांनी सांगितले.