लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५३११ घरांची सोडत महिन्याभरापासून रखडली असून २४ हजारांहून अधिक अर्जदार सोडतीच्या प्रतीक्षेत आहेत. असे असताना कोकण मंडळाला सोडतीसाठी मुहूर्त मिळू शकलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेच सोडत काढण्याचा म्हाडाचा अट्टाहास असून मागील काही दिवसांपासून म्हाडा प्राधिकरण मुख्यमंत्र्यांची वेळ घेण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र त्यांची वेळ मिळत नसल्याने सोडत रखडली आहे. आता मुख्यमंत्री दावोसला गेले असून दावोसवरून परतल्यानंतर राम मंदिराचे उद्घाटन आणि पुढे प्रजासत्ताक दिन यात मुख्यमंत्री व्यस्त असणार आहेत. त्यामुळे म्हाडाच्या सोडतीला २६ जानेवारीनंतरचाच मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे.
कोकण मंडळाच्या ५३११ घरांसाठी ७ नोव्हेंबर रोजी सोडत काढण्यात येणार होती. पण अर्ज विक्री – स्वीकृतीला प्रतिसाद न मिळाल्याने या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे ७ नोव्हेंबरऐवजी १३ डिसेंबर रोजी सोडत काढण्याची घोषणा कोकण मंडळाने केली. मात्र सोडतीला काही दिवस शिल्लक असतानाच प्रशासकीय कारण देत १३ नोव्हेंबर रोजी काढण्यात येणारी सोडतही पुढे ढकलण्यात आली. मात्र त्यानंतर अद्याप सोडतीला मुहूर्त मिळालेला नाही. १३ डिसेंबरदरम्यान हिवाळी अधिवेशन असल्याने ही सोडत पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने सोडत रखडल्याचे चित्र आहे. तर आता २६ जानेवारीपर्यंत मुख्यमंत्र्यांची वेळ मिळण्याची शक्यता नाही. याला म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनीही दुजोरा दिला आहे. त्यामुळे २४ हजार अर्जदारांना सोडतीसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आणखी वाचा-न्यायालयाच्या चौकटीत निर्णय; राहुल नार्वेकर यांचे ठाकरे यांना प्रत्युत्तर
अर्जदार नाराज
कोकण मंडळाच्या ५३११ घरांसाठी २४ हजार अर्जदारांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत. अर्जदारांनी पाच हजार रुपयांपासून १५ हजार रुपयांदरम्यान अनामत रक्कम भरली आहे. यात एकापेक्षा अधिक अर्ज भरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सप्टेंबरपासून अर्जदारांचे पैसे अडकले आहेत. सोडत जाहीर होत नसल्याने अर्जदार प्रचंड नाराज आहेत. समाज माध्यमावर अर्जदार आपली नाराजी व्यक्त करीत आहेत. तर लवकरात लवकर सोडत जाहीर करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.