ध्वनी प्रदूषणासंबंधीचे नियम काटेकोर पाळले जावेत याविषयी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश देऊनही ठाणे शहरात या नियमांची राजरोसपणे पायमल्ली होत असून महापालिकेने शांतता क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या १२ ठिकाणी आवाजाच्या पातळीने टोक गाठल्याचा धक्कादायक निष्कर्ष महापालिकेच्या पर्यावरण विभागानेच काढला आहे. तो नुकत्याच जाहीर झालेल्या एका अहवालात नमूद आहे.
शांतता क्षेत्रासाठी ठरवून दिलेली आवाजाची मर्यादा दिवसा ५० तर रात्री ४० डेसिबल इतकी मर्यादित असावी, असा सर्वसाधारण नियम आहे. मात्र, उत्सवांचा हंगाम सुरु होताच शहरातील चौकाचौकांमध्ये ध्वनीवर्धकांचा अक्षरश: धांगडिधगा सुरू होतो आणि ध्वनी प्रदूषण वारेमाप होते, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. गणेश विसर्जनादरम्यान ठाण्यातील तलाव परिसरात तर १०० डेसिबलपेक्षाही अधिक आवाज असतो, असे निदर्शनास आले आहे.
महापालिकेने मध्यंतरी शहरातील १२ जागांवर शांतता क्षेत्र घोषित केले. यामध्ये गोखले मार्गावरील सरस्वती विद्यालय, मनोरुग्णालय परिसर, मंगला हायस्कूल, कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कोर्ट नाका, जिल्हा रुग्णालय, हॉलीक्रॉस शाळा, वसंत विहार येथील लोक रुग्णालय, पाचपाखाडी येथील कौशल्य रुग्णालय परिसर, चंदनवाडी येथील चिरंजीव रुग्णालय, बेडेकर रुग्णालय तसेच बेडेकर शाळेच्या परिसराचा समावेश करण्यात आला. या ठिकाणी गाडय़ांनीही जोरात हॉर्न वाजवू नये यासाठी वाहतूक पोलिसांनाही कळविण्यात आले. तरी याच शांतता क्षेत्रात आवाजाची पातळी वाढत असून उत्सव काळात तर तिला घरबंध उरत नसल्याचे दिसत आहे.
दहीहंडी, गणेशोत्सव नकोसे
ठाणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने शांतता क्षेत्रात दुपारी दीड ते अडीच आणि रात्री आठ ते नऊ या वेळेत केलेल्या पहाणीत एकाही ठिकाणी ध्वनीची पातळी मर्यादेत आढळली नाही. ध्वनी मानकांनुसार औद्योगिक क्षेत्रात ७५ डेसिबल तर रहिवासी क्षेत्रात ५५ डेसिबल इतक्या आवाजाची मर्यादा आखून देण्यात आली आहे. शांतता क्षेत्रांसह ठाणे, कळवा आणि मुंब्रा परिसरातील तब्बल ६४ महत्वाच्या चौकांमधील आवाजाची पातळी तपासली असताना कोठेही ही मानके पाळली जात नसल्याचे आढळून आले आहे. उत्सवांच्या काळात तर हा ‘गोंगाट’ ९०-९५ डेसिबलच्या पुढे सरकतो, असा निष्कर्ष आहे. विशेष म्हणजे, शांतता क्षेत्रात ध्वनीवर्धकांचा वापर करत उत्सव साजरा करण्यात ठाणे शहर आघाडीवर असून यामुळे हे प्रदूषण आणखी वाढू लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा