मुंबई : Mumbai Weather Forecast गेले तीन – चार दिवस मुंबई शहर, उपनगरांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यातच हवामान खात्याने शुक्रवारी मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार मुंबई शहर, तसेच उपनगरांत शुक्रवारी दुपारी १२ नंतर पावसाचा जोर वाढला. मुंबईतील कुर्ला, चेंबूर, विक्रोळी, अंधेरी परिसरात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे सखलभाग जलमय झाले आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. त्याचबरोबर हार्बर मार्गावरही पाणी साचल्याने काही काळ लोकलचा खोळंबा झाला.
राज्यातील अनेक भागांत गेल्या तीन – चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत शुक्रवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते, तसेच रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. शुक्रवारी दुपारी १ ते २ च्या दरम्यान कुर्ला येथे पाऊस पडला. या एका तासात कुर्ला येथे ३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे कुर्ला येथे हार्बर मार्गावर पाणी साचले.
पश्चिम द्रुतगती मार्गावर वांद्रे येथे पाणी साचले. त्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. दादर पूर्व भागातही पाणी साचले. ‘अंधेरी सब वे’ही जलमय झाला होता. मुसळधार पावसामुळे मुंबईतील शीव, चेंबूर, हिंदूमाता आदी परिसर जलमय झाले आणि या भागातून जाणाऱ्या बेस्टच्या गाडय़ा अन्य मार्गाने वळवाव्या लागल्या. तसेच शीव येथील सखलभागात पाणी साचल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. दरम्यान, हिंदूमाता, अंधेरी सब वे, डॉकयार्ड जंक्शन, दादर टी.टी, माटुंगा आणि महालक्ष्मी या भागात अर्धा ते एक फूट पाणी साचल्याने तेथील वाहतूक विस्कळीत झाली. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात सकाळी ८ ते सायंकाळी ५.३० या कालावधीत ९२.२ मिलिमीटर, तर, सांताक्रूझ केंद्रात ११५.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
रत्नागिरी व रायगडमध्ये अतिमुसळधार ..
कोकणातही सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, हवामान विभागाने रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या चार जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील आठवडाभर पावसाला पोषक स्थिती..
उपसागरात निर्माण झालेली चक्रिय स्थिती, तसेच मध्यपूर्व बंगालच्या उपसागरात तयार होणारा कमी दाबाचा पट्टा यामुळे पुढील आठवडाभर राज्यात पावसाला पोषक स्थिती असून अनेक भागांत मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यामुळे मुंबईसह ठाणे शहरात शनिवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर, पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत शुक्रवारी दुपारी १ ते २ दरम्यानचा पाऊस (मिलिमीटरमध्ये)
- एफ उत्तर विभाग कार्यालय : ३४
- वडाळा अग्निशमन केंद्र : ३०
- कुलाबा : २९
- वरळी अग्निशमन केंद्र : २७
- विक्रोळी : ५०
- चेंबूर : ४२
- कुर्ला : ३६
- मरोळ : ६१
- विलेपार्ले, सांताक्रुझ : ४५
- अंधेरी : ४२