शिल्लक रजेचे पैसे, वेतनातील फरक मिळवण्यासाठी दोन ते तीन वर्षापासून एसटी महामंडळाकडे निवृत्त कर्मचाऱ्यांचे खेटे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुशांत मोरे

मुंबई: वेतनवाढीतील समान हफ्ते आणि शिल्लक रजेचे पैसे निवृत्तीनंतरही गेल्या दोन ते तीन वर्षात मिळाले नसल्याने एसटीतील हजारो कर्मचारी मुंबईतील एसटी मुख्यालयात सातत्याने खेटे मारत आहेत. महामंडळ तोट्यात असून पैसे नाहीत, अशी कारणे एसटी अधिकाऱ्यांकडून निवृत्त कर्मचाऱ्यांना दिली जात आहेत. अशा प्रत्येक निवृत्त कर्मचाऱ्यांची दोन लाखांपासून ते आठ लाखांपर्यंत थकित रक्कम महामंडळाकडे आहे. कमी निवृती वेतन, त्यात हक्काची रक्कमही मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या कर्मचाऱ्यांना फक्त आश्वासन घेऊन रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

हेही वाचा >>> घरांचा ताबा मिळत नसल्याने गिरणी कामगार आक्रमक; बुधवारी आझाद मैदानावर मोर्चाचे आयोजन

हेही वाचा >>> सावरकरांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध करणार का?; देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल

निवृत्तीनंतर एसटी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधी, शिल्लक रजेचे पैसे व वेतनवाढीतील फरक दिला जातो. ही सर्व देणी २०१८ पर्यत निवृत्त अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या पश्चात कुटूंबियांना मिळत होती. परंतु २०१९ पासून ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधी सोडल्यास वेतनवाढीतील ४८ समान हप्त्यापैकी काही हप्त्यांची रक्कम आणि शिल्लक रजेचे पैसे निवृत्त कर्मचाऱ्यांना अद्यापही मिळालेले नाही. राज्यात एसटीचे असे हजारो निवृत्त कर्मचारी असून ही रक्कम मिळवण्यासाठी मुंबईतील एसटीच्या मुख्यालयात कर्मचारी येत आहेत. थकित रक्कम मिळावी, यासाठीचे निवेदन दिल्यानंतर ती रक्कम देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून दिले जाते. मात्र गेल्या तीन वर्षात काही निवृत्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतरही त्यांच्या कुटुंबियांनादेखिल थकित रक्कम मिळालेली नाही.

हेही वाचा >>> सुधारित मोटार वाहन कायद्याच्या वैधतेला आव्हान; केंद्र सरकारला याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

पुण्यातील स्वारगेट आगारात लेखनिक म्हणून काम करणारे दत्तात्रय कदम यांनी ३५ वर्षे एसटीत नोकरी केली आणि जून २०२० मध्ये निवृत्त झाले.  २३५ दिवसांच्या शिल्लक रजेचे साडे पाच लाख रुपये आणि वेतनवाढीतील ४८ समान हप्त्यांपैकी २३ हप्त्यांची पावणे दोन लाख रुपये थकित रक्कम अद्यापही महामंडळाकडून मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. एसटी महामंडळात आधी निवृत्ती वेतन नव्हते. शासनाने १९९५ सालापासून निवृत्ती वेतन कायदा लागू केला. त्यामुळे ३५ वर्षे नोकरी केल्यानंतर महिन्याला अवघे ३ हजार ६५३ रुपये निवृत्ती वेतन मिळत आहे. पण त्यावर गुजराण कशी करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा >>> ‘धार्मिक उन्माद घडवणारे हे बिल्किस बानो प्रकरणाचे खरे गुन्हेगार’

एसटीत सहाय्यक वाहतुक निरिक्षक म्हणून काम करणारे दीपक तिळवे हे नोव्हेंबर २०२० मध्ये निवृत्त झाले. ३२ वर्षे सेवा केल्यानंतर त्यांनाही ३ हजार ७६७ रुपये निवृत्ती वेतन मिळत आहे. त्यांनीही हक्काच्या रक्कमेसाठी महामंडळाकडे वारंवार खेटे मारल्याचे सांगितले. वेतनवाढीतील समान हप्ता आणि शिल्लक रजेचे मिळून साडेचार लाख रुपये रक्कम मिळालेली नाही. ही रक्कम मिळावी, यासाठी एसटीच्या मुंबईतील मुख्यालयाकडेही अर्ज केल्याचे ते म्हणाले. मात्र ही रक्कम अद्यापही मिळालेली नाही. त्यामुळे निवृत्तीनंतर स्वत:चा खर्च भागविताना नाकीनऊ येत असल्याचे तिळवे म्हणाले. त्यांच्यासह अशा हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांना थकित रक्कम न मिळाल्याने ते हवालदिल झाले आहेत.

हेही वाचा >>> बनावट शपथपत्रांप्रकरणी निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; राजकीय पक्षाच्या सहभागाबाबत तपास सुरू

एसटी महामंडळ तोट्यात

२०१९-२० मध्ये ७ हजार ८९० कोटी रुपये उत्पन्न, तर खर्च ८ हजार ७९० कोटी रुपये होता. परिणामी ९१९ रुपये तोटा झाला. २०२०-२१ मध्ये करोनाकाळात प्रवाशांनी पाठ फिरवल्याने मोठा आर्थिक फटका बसू लागला. तोटा १ हजार ७२८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. या तोट्यात आणखी वाढ झाली असून प्रवासी अद्यापही न मिळाल्याने उत्पन्न कमी, खर्च जास्त झाला आहे. यामुळे २ हजार २७५ कोटी रुपये तोटा झाला आहे.

निवृत्त कर्मचाऱ्यांना थकित रक्कम वेळेवर देण्याचा प्रयत्न करत आहोत. काहींना ही रक्कम हळूहळू दिली जात आहे. करोनानंतर एसटीला आर्थिक फटका बसला असून उत्पन्नही कमी झाले आहे. तरीही यातून मार्ग काढून कर्मचाऱ्यांची देणी दिली जात आहेत. 

  • शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Low pensions plight of st employees even after retirement mumbai print news ysh