मुंबई : गोराई येथील म्हाडाच्या वसाहतीत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयाने या परिसरात एक प्रयोग केला आहे. पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल करून पाण्याचा दाब वाढतो का याची चाचपणी करण्यात येत आहे. हा प्रयोगाचा आढावा पाणीपुरवठ्याबाबत घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.
मुंबईच्या एका टोकाला असलेल्या गोराईलगत खाडी आहे. मुंबईतील टोकाला असलेल्या परिसरातील वस्त्यांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना कायम पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. पाणी कपात लागू केल्यानंतर या रहिवाशांचे पाण्याअभावी हाल होतात. या भागात दररोज सकाळी ११.३० च्या सुमारास पाणीपुरवठा होतो, तेथे प्रत्यक्षात दुपारी १२ वाजल्यानंतरच पाण्याचा दाब वाढतो, त्यामुळे पाणीपुरवठ्याबाबत येथील रहिवासी नेहमी तक्रारी करीत असतात, अशी माहिती या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते शिवा शेट्टी यांनी दिली.
हेही वाचा : शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा मुद्दा उच्च न्यायालयात, उद्या सुनावणी
आर मध्य विभागातील जल विभागाने दोन दिवस या परिसरातील पाणीपुरवठ्याची वेळ बदलली असून या परिसरातील पाणीपुरवठा ११.४५ च्या सुमारास सुरू करण्यात आला. या परिसरात मोठी लोकवस्ती असल्याने पाणीपुरवठ्याचे जाळे मोठे आहे. त्यामुळे अन्य विभागांतील पाणीपुरवठ्याच्या वेळाशी जुळवून घेत ही वेळ बदलण्यात आली आहे. प्रायोगिक तत्वावर दोन दिवस पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल करून त्याचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.