१३ दिवसांत २६ ठिकाणी कारवाई; दूषित बर्फाविरोधात एफडीएची विशेष मोहीम
दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्यामुळे बर्फाची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. मात्र बेकायदा बर्फाचे उत्पादन करणाऱ्यांची संख्याही वाढल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुंबई व नवी मुंबईतील २६ ठिकाणी छापे मारण्यात आले असून यात ७२ हजारांचा निकृष्ट दर्जाचा बर्फ नष्ट करण्यात आला आहे. ८ ते २१ मे या दरम्यान अन्न व औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात अन्न व औषध प्रशासनाकडून सरबतांचे स्टॉल्स, आइस्क्रीम केंद्र, बर्फाच्या गोळ्याचे केंद्र येथील पदार्थाची तपासणी करण्यात येते. मात्र या वर्षीच्या सुरुवातीपासूनच दूषित बर्फाच्या तक्रारींचे प्रमाण अधिक असल्याने दूषित बर्फाविरोधातील विशेष मोहीम ८ ते २१ मे या दरम्यान सुरू केली होती.
यामध्ये २६ ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. यांमध्ये बर्फाच्या कंपन्यांपासून, उपाहारगृह, स्टॉल्स यांचाही समावेश आहे.
येथील ३४,५९८ किलो बर्फ नष्ट करण्यात आला असून याची किंमत ७१ हजार ५२४ इतकी आहे. मुंबईत बर्फाचे उत्पादन करणाऱ्या नऊ तर नवी मुंबईत पाच कंपन्या आहेत. यापैकी अनेक कंपन्यांमध्ये खाण्यास योग्य व औद्यगिक वापराचा बर्फ अशा दोन्ही प्रकारच्या बर्फाचे उत्पादन केले जाते. औद्योगिक बर्फाचा वापर रासायनिक कंपन्या, औषध उद्योग, मत्स्यव्यवसाय येथे केला जातो.
गेल्या आठवडय़ात यापैकी अंबिको आइस, महाराष्ट्र आइस डेपो, भारत आइस (काळा चौकी), चांदीवली आइस या कंपन्यांवर कारवाई करण्यात आली.
या ठिकाणी बर्फ साठविण्यासाठी अस्वच्छ पद्धतींचा अवलंब केला होता. जो खाण्यायोग्य नसल्याने या कंपन्यांतील हजारो रुपयांचा बर्फ नष्ट करण्यात आला, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे (अन्न) सहआयुक्त सुरेश अन्नपुरे यांनी ‘लोकसत्ता’शी या वेळी बोलताना सांगितले.
अखाद्य बर्फ
मुंबईत ठिकठिकाणी सरबत, बर्फाचा गोळा याचे हजारो केंद्र आहेत. मात्र अन्न व औषध प्रशासनाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे प्रत्येक केंद्रावर लक्ष ठेवणे शक्य होत नाही. मात्र ग्राहकांना चांगल्या आरोग्यासाठी खाद्य व अखाद्य बर्फ यातील फरक समजणे आवश्यक आहे. यासाठी बर्फाचे उत्पादन करतानाच अखाद्य बर्फात खाण्याच्या रंगाचा वापर केला आणि त्याला वेगळा रंग दिला तर ग्राहकांना अखाद्य बर्फ ओळखणे सोपे जाईल, असे अन्न व औषध प्रशासनाच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू असून लवकरच या संदर्भातील प्रस्ताव महानगरपालिकेला पाठविण्यात येणार आहे.
ई-कोलाय आरोग्यास घातक
गेल्या महिन्यात पालिकेने केलेल्या पाहणीत फेरीवाल्यांकडील ९५ टक्के बर्फ दूषित असल्याचे समोर आले होते. यातील ७५ टक्के नमुन्यांमध्ये ई-कोलाय जिवाणू आढळून आले होते. या ई-कोलायमुळे अतिसार, जुलाब, कॉलरा, कावीळ, विषमज्वर या आजारांची लागण होते. त्यामुळे नागरिकांनी बाहेर तयार केलेले थंड पदार्थ खाताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.