मुंबई : राज्यात जुलैपासून सुरू झालेल्या १८ ते ५९ वयोगटातील वर्धक मात्रेचा प्रतिसाद मोठय़ा प्रमाणात वाढला होता. परंतु मागील चार दिवसांमध्ये पुन्हा हा प्रतिसाद कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

राज्यभरात १५ जुलैपासून १८ ते ५९ वयोगटासाठी मोफत वर्धक मात्रा सुरू केली गेली. सुरुवातीला या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला. वर्धक मात्रेच्या दैनंदिन लसीकरणाने पहिल्याच दिवशी एक लाखांचा टप्पा पार केला. त्यानंतर उत्तरोत्तर लसीकरणाचे प्रमाण वाढतच गेले. या लसीकरणाने २२ जुलैला दोन लाखांचा टप्पाही पार केला. त्यानंतर दैनंदिन सुमारे दीड लाखापर्यंत लसीकरण केले जात होते. परंतु जुलैच्या शेवटच्या काही दिवसांपासून लसीकरणाचा जोर पुन्हा कमी होत असल्याचे आढळले आहे. ऑगस्टपासून तर यात आणखीनच घट होऊन एक लाखापर्यंत आले आहे. १८ ते ५९ वयोगटासाठीची मोफत वर्धक मात्रा सप्टेंबरपर्यतच सुरू असणार आहे. आतापर्यंत या वयोगटातील सुमारे पाच टक्के नागरिकांनीच लशीची वर्धक मात्रा घेतली आहे. त्यामुळे आता पुढील दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असून यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरम्ण होणे गरजेचे आहे. परंतु आता राज्यात सर्वत्रच करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे वर्धक मात्रेचा प्रतिसादही कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

लसीकरण..

करोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर एकूण लसीकरणाचा जोर कमी झाला. फेब्रुवारीमध्ये सरासरी दैनंदिन सुमारे २ लाख ६८ जणांचे लसीकरण केले जात होते. मार्चपासून यात उत्तरोत्तर घट होत गेली. मे महिन्यात हे प्रमाण सुमारे ६० हजारांवर आले. जूनमध्ये करोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात वाढल्यानंतर पुन्हा काही अंशी लसीकरणातही वाढ झाली. या काळात सरासरी दैनंदिन लसीकरण सुमारे ८५ हजारांवर गेले. जुलै महिन्यात मोफत वर्धक मात्रा सुरू झाल्यावर हे प्रमाण थेट सुमारे १ लाख २४ हजारांवर गेले होते. राज्यात पहिल्या मात्रेचे लसीकरण ९० टक्के झाले आहे, तर दुसऱ्या मात्रेचे लसीकरण सुमारे ७४ टक्के झाले आहे.

४३४ नव्या रुग्णांची नोंद

मुंबईतील दैनंदिन करोना रुग्णसंख्येत बुधवारी अचानक मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. दिवसभरात ४३४ नव्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या महिन्याभरात अडीचशे ते पावणेतीनशेच्या दरम्यान रुग्णसंख्या असताना अचानक मोठी रुग्णवाढ झाली असून उपचाराधीन रुग्णसंख्याही वाढली आहे. दिवसभरात २८२ रुग्ण करोनामुक्त झाले. एका ७३ वर्षीय रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाला.

Story img Loader