मुंबई : दक्षिण मुंबईतील कुपरेज मैदानात लहान मुलांसाठी हॉर्स कॅरोसेल अर्थात फिरते चक्र (मेरी गो राऊंड) तयार करण्याकरीता पालिकेने इच्छुक संस्थांकडून स्वारस्य पत्रे मागवली होती. मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे हा प्रकल्प रखडण्याची शक्यता आहे.
दक्षिण मुंबईतील कुपरेज मैदानात लहान मुलांसाठी हॉर्स कॅरोसेल अर्थात फिरते चक्र (मेरी गो राऊंड) तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेने मार्च महिन्याच्या अखेरीस इच्छुक संस्थांकडून स्वारस्य पत्र मागवले होते. मात्र त्याला निविदाकारांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे या प्रकल्पासाठी महापालिकेने निधीची तरतूद करावी किंवा सीएसआरद्वारे (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधी उभारण्याचा विचार करावा, अशी मागणी भाजपचे कुलाबामधील माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केली आहे.
पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना लिहिलेल्या पत्रात नार्वेकर यांनी म्हटले आहे की, प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहार्यतेबद्दल शंका असल्यामुळे पालिकेला या कामासाठी कमी प्रतिसाद मिळाला आहे. हा उपक्रम शहरासाठी महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच निधीअभावी तो रद्द केला जाऊ नये. हा उपक्रम कूपरेज मैदानाचे ऐतिहासिक वैभव पुनर्स्थापित करण्यात आणि मुंबईच्या विद्यमान पर्यटन स्थळांच्या यादीत आणखी एक पर्यटन स्थळ उभे राहू शकते. त्यामुळे महापालिकेने या प्रकल्पासाठी निधी उभारण्याकरीता प्रयत्न करावे अशी मागणी नार्वेकर यांनी केली आहे.
सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल अंतर्गत जास्तीत जास्त ३२ आसन क्षमतेचे हॉर्स कॅरोसेल या उद्यानात स्थापन केले जाणार आहे. स्वारस्य निविदेनुसार, सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल अंतर्गत जास्तीत जास्त ३२ आसन क्षमतेचे हॉर्स कॅरोसेल स्थापन करण्यासाठी पालिकेने इच्छुकांकडून प्रस्ताव मागवले आहेत. त्यामुळे यात पालिकेची जागा आणि संस्थेचा खर्च अशी रचना आहे.
या पद्धतीत पालिकेला पैसा खर्च करावा लागणार नाही, असे हे मॉडेल असल्याची माहिती पालिकेचे सहाय्यक आयुक्त जयदीप मोरे यांनी दिली. तसेच सात वर्षांसाठी परिचालन आणि देखभालही संस्थेला करावी लागणार आहे. यशस्वी बोली लावणारा कंत्राटदार प्रकल्पासाठी महसूल मॉडेल सादर करेल असेही या निविदेत म्हटले आहे.