सकाळच्या गुलाबी थंडीचा कडाका वाढत असून मुंबईकरांवर आता स्वेटर आणि ब्लँकेट वापरासाठी काढण्याची वेळ आली आहे. या हंगामातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद गुरुवारी सकाळी झाली असून थंडीचा कडाका पुढील काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
डिसेंबर महिना सुरू होताच शहरात गुलाबी थंडी सुरू झाली. गेल्या पंधरा दिवसांत किमान तापमानाचा पारा १६ ते २० अंश से. दरम्यान वर-खाली होत होता. त्यामुळे सकाळी आणि रात्री हवेतील गारवा चांगलाच वाढला होता. गुरुवारी सांताक्रूझ येथे किमान तापमान १५ अंश से. नोंदले गेले. कुलाबा येथे २०.५ अंश से. नोंद झाली.
२००८ ते २०१५ या काळात किमान तापमान ११ ते १४ अंश से. पर्यंत उतरले होते. मात्र गेल्या वर्षांपासून या काळात किमान तापमानाचा पारा १५ अंशापर्यंतच खाली गेल्याची नोंद हवामान खात्याकडे आहे. तसेच गेल्या दोन वर्षांपासून थंडी उशिरा येत असल्याचे स्पष्ट होते.