ठाण्यातील वाहतुकीसाठी ‘लाइट रेल ट्रान्सपोर्ट’ (एलआरटी) कशा प्रकारे फायदेशीर ठरू शकते, या विषयी महापालिका प्रशासनाने शुक्रवारच्या महासभेत चित्रफितीद्वारे माहिती सादर करून नगरसेवकांना महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच मोनो, मेट्रो आणि बीआरटीएस या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या तुलनेत एलआरटीची प्रवासी वाहनक्षमता जास्त आणि खर्चही कमी असून ती प्रदूषणविरहित असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने या सादरीकरणामध्ये केला आहे.
शहरातील आनंदनगर ते कासारवडवली या १० किमीच्या मार्गावर एलआरटी सुरू करण्याची घोषणा महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांनी महिनाभरापूर्वी केली होती. त्यानुसार, महापालिका प्रशासनाने एलआरटीचा सविस्तर अभ्यास सुरू केला होता. त्याच्याआधारे एलआरटीविषयी माहितीपूर्ण चित्रफीत तयार करण्यात आली असून महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या महासभेत या चित्रफितीचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये एलआरटीला पाच ते दहा डबे जोडता येऊ शकतात, तसेच तिची प्रतिताशी प्रवासी वाहनक्षमता २० ते ३० हजार इतकी आहे. बीआरटीएसची प्रतिताशी प्रवासी वाहनक्षमता १५ ते २० हजार असून तिला तीनहून अधिक डबे जोडणे शक्य नाही. तसेच मोनोची प्रतिताशी प्रवासी वाहनक्षमता १५ ते २५ हजार तर मेट्रोची प्रतिताशी प्रवासी वाहनक्षमता ३० ते ५० हजार इतकी आहे. मात्र. त्यांचा खर्च जास्त आहे. प्रतिकिमीमागे एलआरटीकरिता ८० कोटी रुपये, मोनोकरिता १५० कोटी रुपये तर मेट्रोकरिता २५० कोटी रुपये खर्च येतो, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली. जास्त प्रवासी वाहनक्षमता तसेच खर्चही कमी असल्याने सार्वजनिक वाहतुकीसाठी एलआरटी हा चांगला पर्याय असल्याचा दावा प्रशासानाने यावेळी केला. इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या तुलनेत एलआरटीच्या देखभाल दुरुस्तीसाठी मर्यादित यंत्रणा लागते, तसेच एलआरटी प्रदूषणविरहित आहे, असा दावाही प्रशासनाने यावेळी केला. दरम्यान, एलआरटीचा प्रकल्प अहवाल तयार करणे, त्यासाठी तज्ज्ञ सल्लागार नेमणे आणि सेवा रस्त्याचा वापर एलआरटी धावण्यासाठी करणे, असा प्रस्ताव पुढील महासभेत मंजुरीसाठी सादर करण्यात येईल, असेही प्रशासनाने सभागृहात स्पष्ट केले.
महापौरांचा पाठिंबा
एलआरटी उपक्रम राबविण्याविषयी शिवसेनेच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत असल्याने आधी पक्षाची भूमिका स्पष्ट करा, त्यानंतरच एलआरटीचे सादरीकरण करा, अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली. तसेच पक्षाऐवजी महापौरांची एलआरटीबाबत काय भूमिका आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे, अशीही मागणी करण्यात आली. त्यावेळी एलआरटीला आपला पाठिंबा असल्याचे महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी जाहीर केले.

Story img Loader