Lucky Yatri लोकल ट्रेन ही मुंबईची लाईफलाईन. रोज लाखो प्रवासी लोकलने प्रवास करत असतात. लोकलने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने आता लकी यात्री योजना आणली आहे. या योजनेच्या अंतर्गत प्रवाशांना रोज १० हजार रुपये आणि आठवड्याला ५० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. रेल्वे प्रवस्ते स्वप्नील निळे यांनी ही माहिती दिली. पुढील आठवड्यापासून पुढचे आठ आठवडे ही योजना चालवली जाणार आहे.

काय आहे लकी यात्री योजना?

लकी प्रवासी योजना अत्यंत सोप्या आणि पारदर्शक पद्धतीने राबवली जाईल. प्रत्येक दिवशी एका प्रवाशाची निवड अशा पद्धतीने ही योजना रेल्वे स्थानकांवर राबवली जाणार आहे. तिकिट चेकर म्हणजेच तिकीट तपासणी अधिकारी लकी प्रवाशाची निवड करुन त्याचं तिकिट किंवा पास तपासणार आहेत. सध्याच्या घडीला साधारण १० ते २० टक्के प्रवासी विनातिकीट प्रवास करतात त्यांना पकडण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो. प्रवाशांनी मोठ्या प्रमाणावर तिकिट किंवा पास काढावा यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून ही योजना आणण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. रोज एका प्रवाशाला १० हजारांचं बक्षीस मिळणार आहे. तर आठवड्यातून एका प्रवाशाला ५० हजारांचं बक्षीस मिळणार आहे. मध्य रेल्वेने आणलेल्या या योजनेमुळे प्रवाशांची चांदी झाली आहे यात शंका नाही. याबाबत प्रवाशांनाही आनंद व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

प्रवासी या योजनेबाबत काय म्हणत आहेत?

मी रोज कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा प्रवास ट्रेनने करतो. ट्रेनचं तिकिट काढलं असेल किंवा पास असेल आणि ते तिकिट तपासनीसाने निवडलं आणि लकी प्रवासी ठरलो तर १० हजार रुपये मिळणार ही योजनाच मला सुखावणारी वाटतो आहे. वीरेंद्र पवार यांनी हे सांगितलं. तर विनातिकिट प्रवास टाळावा म्हणून प्रवाशांसाठी आणलेली ही उत्तम योजना आहे असं डोंबिवलीच्या श्रुती देसाई यांनी सांगितलं आहे.

मध्य रेल्वेनेने आणलेली योजना कुणासाठी आहे?

सर्वसामान्य तिकिटधारक आणि पास धारक यांच्यासाठी ही योजना खुली आहे. यासाठी कोणत्याही श्रेणीतला पास किंवा तिकिट असलं तरीही चालणार आहे. लकी प्रवासी ठरलेल्या व्यक्तीला कुठलंही अतिरिक्त शुल्क न भरता बक्षीस मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या माहितीनुसार रोज सुमारे ४० लाख प्रवासी ट्रेनने प्रवास करतात. त्यापैकी २० टक्के प्रवासी विनातिकिट वा पास प्रवास करतात. तिकिट तपासणीमध्ये रोज विविध स्थानकांवर सुमारे ४ ते ५ हजार प्रवासी पकडले जातात. अधिकाधिक लोकांनी तिकिट काढलं पाहिजे किंवा पास काढला पाहिजे आणि मगच प्रवास केला पाहिजे यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. ही योजना आठ आठवडे चालवण्यात येणार आहे.