मुंबई : विविध चाचण्या केल्यानंतर कर्करोगाचे निदान होण्यासाठी साधारणपणे पाच ते १० दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे अनेक रुग्णांवर उपचार करण्यास विलंब होतो. मात्र आता फुफ्फुसामध्ये झालेल्या कर्करोगाचे निदान अवघ्या १० मिनिटांमध्ये करणे शक्य होणार आहे. ऑन्को प्रेडिक्ट चाचणीच्या माध्यमातून हे शक्य झाले असून, ही चाचणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून करण्यात येते.
हेही वाचा >>> परदेशातील नोकरीचे आमिष दाखवून देशभरातील अनेक तरूणांची फसवणूक; गुन्हे शाखेकडून पाच जणांना अटक
देशामध्ये अनेक जण फुप्फुसाच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत. धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. कर्करोगाचे निदान हे गुणसूत्रांमधील बदलांच्या माध्यमातून करणे शक्य असल्याचे ऑन्को प्रेडिक्ट चाचणीतून स्पष्ट झाले आहे. ही चाचणी करण्यासाठी डाॅक्टरांना रुग्णाची बायोप्सी करून त्याच्या पेशी संकलित कराव्या. या संकलित केलेल्या पेशींची एक स्लाईड तयार करून ती वन सेलच्या लिकंवर अपलोड करायची आहे. त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या माध्यमातून डॉक्टरांना रुग्णाच्या गुणसूत्रांमध्ये बदल झाला आहे की नाही हे कळणार आहे. गुणसूत्रामंध्ये बदल झाल्याचे दिसून आल्यास डॉक्टर उपचार दिशा ठरवून त्या पद्धतीने उपचार सुरू करू शकतात, असे वन सेलचे मुख्य संशोधन डॉ. जयंत खंदारे यांनी सांगितले. या चाचणीचा सर्वाधिक लाभ हा टाटा रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांना होणार असल्याचेही खंदारे यांनी सांगितले. मुंबईतील वांद्रे – कुर्ला संकुलातील जिओ कन्व्हेंशन सेंटर येथे सुरू असलेल्या तिसऱ्या इंडियन कॅन्सर कॉंग्रेसमध्ये सादर करण्यत आलेल्या या नव्या चाचणीमुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान अवघ्या १० मिनिटांमध्ये करणे शक्य होणार आहे. २ ते ५ नोव्हेंबरदरम्यान चालणाऱ्या तिसऱ्या इंडियन कॅन्सर कॉंग्रेस २०२३ मध्ये भारतासह दक्षिण पूर्व आशिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका या देशांतील जवळपास पाच ते सहा हजार कर्करोग तज्ज्ञ सहभागी झाले आहेत.